भाजपची पहिली यादी आज जाहीर होणार, कोणाला संधी कोणाला धक्का?

मुंबई | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून आज पहिली उमेदवारी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. महायुतीमध्ये सर्वाधिक जागा भाजप लढणार आहे. भाजपचे ११० उमेदवार ठरले आहेत. यामध्ये काही विद्यमान २० ते २५ आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. त्यामधये राम कदम यांच्या नावाची चर्चा आहे.
भाजपाची पहिली यादी आज किंवा उद्यापर्यंत येऊ शकते, असा अंदाज बांधला जात आहे. दिल्लीत आज यासंदर्भात एक महत्त्वाची बैठक होणार असल्याचे सांगितले जात आहे. दोन दिवसांपूर्वी भाजपा नेत्यांची एक महत्त्वाची बैठक दिल्लीत झाली होती. या बैठकीनंतर १०० किंवा त्यापेक्षा अधिक उमेदवारांची पहिली यादी येऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर आता राज्यातील पक्ष नेतृत्वाने केंद्रातील नेतृत्वाला ११५ जणांच्या नावांची यादी पाठवली आहे. त्यामुळे आता कोणत्या नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार, विद्यमान आमदारांपैकी कोणाची पुन्हा वर्णी लागणार तसेच कोणाचा पत्ता कट केला जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमधील मुस्लिम समाजाचे आंदोलन स्थगित
दरम्यान, महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात असलेल्या भाजपाने यंदा किमान १५० जागा लढवण्याचा पवित्रा घेतला असून जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी पक्षाकडून धक्कातंत्राचा अवलंब केला जाण्याची शक्यता आहे. ज्या आमदारांविरुद्ध मतदारसंघात नाराजी आहे अशा आमदारांची तिकिटे भाजपाकडून कापण्यात येणार आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.





