ठाकरे गटाच्या महिला नेत्याचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’; भाजपची वाट धरत शेअर केली भावनिक पोस्ट

Uddhav Thackeray : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सूनबाई, ठाकरेंचे पक्षाचे दिवंगत माजी नगरसेवक यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
आज दादरच्या वसंत स्मृतीमध्ये तेजस्वी घोसाळकर यांचा भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश झाला. तेजस्वीनी घोसाळकर यांचा प्रभाग क्रमांक 1 हा ओबीसी महिलेसाठी राखीव झाला आहे. घोसाळकर कुटुंबाचे प्राबल्य असलेल्या या त्यांच्या हक्काच्या वार्डात निवडणूक लढविता येणार नाही. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच घोसाळकर यांनी साथ सोडल्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला त्याचा फटका बसणार आहे. यानंतर त्यांनी फेसबूक पोस्ट शेअर करत राजीनामा देण्याचे कारण सांगितले आहे.
ठाकरे गट शिवसेना सदस्यत्वाचा राजीनामा देत असताना तेजस्वी घोसाळकर यांनी एक भावनिक पोस्ट केली आहे. “आज आपल्याशी संवाद साधताना माझं मन प्रचंड उद्गिग्न झालं आहे. आयुष्यात असा क्षण कधी येईल आणि असे शब्द लिहावे लागतील, याची कल्पनाही मी कधी केली नव्हती. आज मन जड आहे…शब्द अपुरे पडत आहेत…पण तरीही हा संवाद आवश्यक आहे. आज राजकारण करताना, जनतेसाठी काम करताना आणि माझ्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडताना मला अपार अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा वेळी मला केवळ पदाची नव्हे, तर मनापासून, निर्भीडपणे आणि मोकळ्या मनाने साथ देणाऱ्या ताकदीची गरज आहे, हे मला वारंवार जाणवत आहे, ” असं तेजस्वी घोसाळकर यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.
हेही वाचा – ‘इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
तेजस्वी घोसाळकर या गेल्या काही दिवसांपासून ठाकरे सेनेत नाराज असल्याची चर्चा होती. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी लढण्याची इच्छा व्यक्त केली होती; मात्र त्यांना तिकीट नाकारण्यात आले होते. त्यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू असतानाच मुंबै बँकेवर त्यांची संचालक म्हणून वर्णी लागली होती. मुंबै बँकवर भाजपची सत्ता आहे. तेजस्वी घोसाळकर यांची मुंबै बँकेच्या संचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर त्या भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.
तेजस्वी घोसाळकर या शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका आहेत. 2017 मध्ये झालेल्या मुंबई महानगरपालिच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाकडून प्रभाग क्रमांक 1 मधून तेजस्वी घोसाळकर विजयी झाल्या होत्या. तेजस्वी या माजी आमदार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते विनोद घोसाळकर यांच्या सून आहेत. दिवंगत माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आहेत.
पती अभिषेक घोसाळकर यांची गेल्या वर्षी गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. लग्नाच्या वाढदिवसाच्या चार दिवस आधीच मॉरिस नामक व्यक्तीने अभिषेक घोसाळकर यांच्यावर फेसबुक लाईव्ह करून गोळ्या झाडल्या होत्या.





