‘एल्विश यादव मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर..’; ठाकरे गटाचा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल

मुंबई : यूट्यूबर एल्विश यादव याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. रेव्ह पार्टीत सापाचे विष आणि परदेशी तरुणींचा पुरवठा केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. याप्रकरणी त्याच्याविरोधात नोएडाच्या सेक्टर ४९ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, यावरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका होऊ लागली आहे.
गणेशोत्वात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एल्विश यादवला वर्षा या शासकीय निवासस्थानी बोलावलं होतं. एल्विशने मुख्यमंत्री शिंदे यांच्या गणपतीची आरतीदेखील केली होती. यावरून शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा – २४ डिसेंबर की २ जानेवारी? सरकारला दिलेल्या मुदतीबाबत बच्चू कडूंचा खुलासा; म्हणाले..
हा एल्विश यादव. विषारी सापांपासून बनवले जाणारे ड्रग्स रेव्ह पार्टीला पुरवण्याचे गुन्हे याच्यावर दाखल आहेत. ड्रग्स शी संबंधित अनेक आरोप एलविश वर आहेत. पण हा नेमका मुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगल्यावर आरती का करत आहे ? @mieknathshinde @rautsanjay61 @OfficeofUT @ShivsenaUBTComm pic.twitter.com/VQmSsT64xU
— SushmaTai Andhare🔥 (@andharesushama) November 3, 2023
सुषमा अंधारे म्हणाल्या, हा एल्विश यादव. विषारी सापांपासून बनवले जाणारे ड्रग्स रेव्ह पार्टीला पुरवण्याचे गुन्हे याच्यावर दाखल आहेत. ड्रग्सशी संबंधित अनेक आरोप एल्विशवर आहेत. पण हा नेमका मुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगल्यावर आरती का करत आहे?
राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टवीर यांनीही यावरून मुख्यमंत्री शिंदेवर टीकास्त्र सोडलं आहे. ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एल्विश यादवसारख्या नशाबाजांना वर्षा बंगल्यावर बोलवून त्याचं आदरातिथ्य केलं होतं. शाल आणि श्रीफळ देऊन त्याचा सत्कार केला होता. महिलांबाबत अपशब्द वापरणारा, ड्रग्जची विक्री करणारा, सापाच्या विषापासून ड्रग्ज बनवणे, त्याचं सेवन करणे आणि ते विकणे असे गंभीर गुन्हे त्याच्या नावावर आहेत.




