‘नवले पुलाजवळ झालेल्या अपघातांबाबत नितीन गडकरींशी चर्चा करणार’; सप्रिया सुळे
![Supriya Sule said that she will discuss with Nitin Gadkari about the accidents that happened near Navle Bridge](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/nitin-gadkari-and-supriya-sule-780x470.jpg)
पुणे : पुणे-बेंगरूळ महामार्गावरील नवले पुलाजवळ आज मध्यरात्री भीषण अपघात झाला आहे. यामध्ये एकूण ४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर २१ जण जखमी झाले आहेत. दरम्यान, नवले पुलाजवळ सातत्याने होत असणाऱ्या अपघातांबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी सकाळी झालेल्या अपघाताची घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पहाटे ट्रक आणि खासगी बसच्या अपघातात चार जणांचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे तर अनेकजण जखमी झाले आहेत. जखमी नागरिकांची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली व त्यांची विचारपूस केली.
प्राथमिक माहितीनुसार ट्रकचे ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात घडल्याचे समोर येत आहे. नवले पुलावर नोव्हेंबर मध्ये मोठा अपघात घडल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व पोलीस यंत्रणा यांच्यामार्फत अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी झाले आहे, परंतू त्यात आणखी सुधारणा करण्याची गरज आहे. या संदर्भात माझा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
रस्ते सुरक्षा हा खुप महत्वाचा विषय आहे, मी या संदर्भात संसदेत देखील मुद्दा मांडला आहे. त्यामुळे सर्व विभागाशी समन्वय साधून हा रस्ता अपघातमुक्त करण्याचा प्रयत्न असणार आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काका चव्हाण, माजी नगरसेवक सचिन दोडके, शरद दबडे, दिपक बेलदरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.