‘देवेंद्र फडणवीस उच्चभ्रू आणि ब्राह्मण जातीच्या बाबांवर कारवाई करत नाही’; श्याम मानव यांचा गंभीर आरोप
![Shyam Manav said that Devendra Fadnavis is not taking action against elite and Brahmin caste fathers](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/01/Devendra-Fadnavis-and-Shyam-Manav-780x470.jpg)
मुंबई | सामाजिक कार्यकर्ते श्याम मानव यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. देवेंद्र फडणवीस सरकार उच्चभ्रू आणि ब्राम्हण जातीच्या बाबांवर कारवाई करत नाही, असं ते म्हणाले. तसंच धीरेंद्रकृष्ण शास्त्री जन्माने ब्राम्हण आहेत म्हणून त्यांच्यावर कारवाई होत नाही का? असा प्रश्न श्याम मानव यांनी उपस्थित केला.
श्याम मानव म्हणाले की, २००५ मध्ये जादूटोणा विरोधी कायदा तयार होत असताना एक सामाजिक न्याय राज्यमंत्री होते. त्यांनी मला चिडून असं सांगितलं की कायद्याचं जे प्रारुप तुम्ही तयार करत आहात त्याने काय होणार आहे? २००५ मध्ये कायदा संमत झाला. त्यावेळी मला ते असं म्हणाले की या कायद्यानुसार तुम्ही आमच्या आदिवासी बाबांवर या कायद्याच्या माध्यमातून कारवाई कराल. गरीब आणि दलितांवर कारवाई कराल. उच्चभ्रू बाबा, ब्राह्मण असलेल्या बाबांवर कारवाई तुम्ही करु शकणार नाही. पोलीस काय किंवा सरकार काय? कुणीही कारवाई करणार नाही असं मला ते म्हणाले होते. मी त्यांना सांगितलं कायदा सगळ्यांसाठी समान आहे त्यामुळे असं होणार नाही. उच्चभ्रू असोत, वरच्या जातीमध्ये जन्माला आलेले असतो किंवा खालच्या जातीत जन्माला आलेले असतील त्याने फरक पडणार नाही.
हेही वाचा – ‘छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार समाजाची दिशाभूल करत आहेत’; बबनराव तायवाडे यांचा आरोप
मी त्या मंत्र्यांना हे समजावलं होतं. मात्र मी जेव्हा देवेंद्र फडणवीस सरकारचं कृत्य पाहतो त्यावेळी मला हे म्हणता येतं की जे उच्चभ्रू किंवा ब्राह्मण जातीत जन्माला आले आहेत त्यांच्याविरोधात सरकार कारवाई करत नाही. सर्वसाधारणपणे दलित, आदिवासी जातीत जन्माला जे आले आहेत त्यांच्यावर पोलीस सहजपणे या कायद्याच्या आधारे कारवाई करतात. धीरेंद्रकृष्ण शास्त्री जन्माने ब्राह्मण आहेत म्हणून त्यांच्यावर कारवाई होत नाही का? असा प्रश्न मी आधीही विचारला आहे. कारण त्या व्हिडीओत ते ‘हम ब्राह्मण हैं, ये अछूत छूना मत’ असे म्हटल्याचा व्हिडिओ उपलब्ध आहे. देशात अॅट्रॉसिटी कायदा आहे, असे म्हणणारा माणूस महाराष्ट्रात येतो, जादूटोणा विरोधी कायद्याचे व ड्रग्ज रेमेडीज कायद्याचे उल्लंघन करतो, तरी सरकार या बाबांवर कारवाई करत नाही, असा आरोप श्याम मानव यांनी केला आहे.