breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रमुंबईराजकारण

राज्यसभेसाठी शिवसेना सहावा उमेदवार देणार, संभाजीराजेंना मोठा धक्का

मुंबई : राज्यसभेसाठी शिवसेना सहावा उमेदवार देणार असल्याची घोषणा शिवसेनेचे नेते तथा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे. शिवसेनेच्या घोषणेने संभाजीराजेंना मोठा धक्का बसला आहे. कारण राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी सर्वपक्षीयांनी मला मदत करावी, असं आवाहन मागील आठवड्यात संभाजीराजेंनी केलं होतं. त्यांच्या आवाहनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिसाद दिला होता. पण आज मंत्री परब यांनी राज्यसभेसाठी शिवसेना सहावा उमेदवार देणार असल्याची घोषणा करुन संभाजीराजेंच्या राज्यसभेच्या वाटेत काटे पेरले आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह १५ राज्यातील राज्यसभेवर रिक्त होणाऱ्या ५७ खासदारांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यात महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या १० जून रोजी मतदान होणार आहे. राज्यसभेतून भाजपचे पीयूष गोयल, विनय सहस्त्रबुद्धे आणि विकास महात्मे तर शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे पी. चिदंबरम असे सहा सदस्य ४ जुलै रोजी निवृत्त होत आहेत. या रिक्त होणाऱ्या जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. मात्र बदललेल्या राजकीय समीकरणांनुसार आणि महाराष्ट्र विधानसभेतील संख्याबळ लक्षात घेता भाजपचे दोन उमेदवार तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एक उमेदवार राज्यसभेवर निवडून जाऊ शकतो. तत्पूर्वी, उर्वरित सहाव्या जागेसाठी शिवसेनेने दावा सांगितला आहे.

  • शिवसेनेचा दुसरा उमेदवार, संभाजीराजेंची मोठी अडचण

राज्यसभेसाठी शिवसेना दोन उमेदवार उभे करणार आहे. संजय राऊत यांची फेरनिवड जवळपास निश्चित मानलं जात आहे. त्यात आता परब यांच्या घोषणेने शिवसेनेचा दुसरा उमेदवार कोण याबाबतचा सस्पेन्स वाढला आहे.

  • संभाजीराजेंना पाठिंबा देण्यावरुन महाविकास आघाडीत किंतु परंतु

शिवसेनेच्या निर्णयाने संभाजीराजेंची मोठी अडचण होण्याची शक्यता आहे. आपण अपक्ष म्हणून राज्यसभेत जाणार आहोत, त्यासाठी मला सर्वपक्षीयांनी मदत करावी, असं आवाहन संभाजीराजेंनी केलं आहे. मात्र त्यांची उमेदवारी भाजपच्या रणनीतीचा भाग असू शकते, असा अंदाज महाविकास आघाडीतील नेत्यांचा आहे. त्यामुळे संभाजीराजेंना पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडीत किंतु परंतु आहेत.

  • संभाजीराजेंचं आवाहन काय?

छत्रपती संभाजीराजे मागील वेळी राष्ट्रपती नियुक्त खासदार होते. आपल्या खासदारकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले असं सांगतानाही त्यांनी दोघांचेही आभार मानले. पण आता यावेळी मात्र आपला सवता सुभा असेल, असे त्यांनी जाहीर केले आहे. राज्यसभेची निवडणूक आपण अपक्ष लढवणार असल्याची घोषणा संभाजीराजे छत्रपती यांनी पुण्यातल्या पत्रकार परिषदेत केली. राज्यसभेसाठी लागणाऱ्या आमदारांची मतं आणि सध्या पक्षीय बलाबलानुसार असलेलं गणितं मांडून सर्वपक्षीयांनी आपल्याला राज्यसभेवर जाण्यासाठी पाठिंबा द्यावं, असं आवाहन काल संभाजीराजेंनी केलं.

  • आकड्यांचं गणित…!

सध्या महाविकास आघाडीकडे १६९ आमदार आहेत. शिवसेना ५५, राष्ट्रवादी ५४, काँग्रेस ४४, इतर पक्ष ८ आणि अपक्ष ८ असं महाविकास आघाडीकडे संख्याबळ आहे. तर भाजपकडे ११३ आमदारांचं संख्याबळ आहे. भाजपचे १०६ आमदार, रासप १, जनसुराज्य १ आणि अपक्ष ५ आमदार अशा एकूण ११३ आमदारांचं वजन भाजपकडे आहे.

राज्यसभेचा खासदार होण्यासाठी मतांचा कोटा किती असावा, यासाठीचं एक सूत्र आहे. यानुसार राज्यातील एकूण विधानसभा सदस्यांची संख्या भागिले (÷) राज्यसभेच्या रिक्त जागा +१ = आलेली संख्या + १ = संबंधित आलेली संख्या …….. हा विजयी उमेदवारांचा निकष
त्यानुसार २८८ ही महाराष्ट्र विधानसभेची संख्या ÷ राज्यसभेच्या रिक्त जागा ६ +१

म्हणजेच २८८ ÷६ = ४१.१४ अधिक १ = ४२

एकंदर काय तर, महाविकास आघाडीकडे १६९ आमदार आणि भाजपकडे ११३ आमदार आहेत. संख्याबळानुसार शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एक उमेदवार सहज राज्यसभेवर निवडून जाऊ शकतो. तर भाजपचे दोन उमेदवार राज्यसभेवर जाऊ शकतात. महाराष्ट्र विधानसभेतील सध्याच्या आमदारांचे संख्याबळ लक्षात घेता सहाव्या जागेसाठी राखण्यासाठी सत्ताधारी महाविकास आघाडीला आणि भाजपला प्रयत्नांची पराकष्ठा करावी लागेल.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button