शीतल म्हात्रे यांचा व्हिडिओ ३२ देशातील लोकांना पाहिलाय, राज सुर्वे यांच्या फेसबुक अकाऊंटची तपासणी करा: अंबादास दानवे
![Sheetal Mhatre, video viewed by people in 32 countries, Raj Surve, check, Facebook account, Ambadas Danve,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/Ambadas-Danave-780x470.png)
मुंबई: आमदार प्रकाश सुर्वे आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडिओवरुन सुरु असलेल्या राजकीय वादाचे पडसाद मंगळवारी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही उमटले. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या मुद्द्यावरुन शिवसेनेला( शिंदे गट) चांगलेच टोले लगावले. तसेच प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे यांच्या फेसबुक अकाऊंटचीही तपासणी व्हावी, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली.
एका आमदाराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तो व्हिडिओ मीच १० लोकांना पाठवला आहे. युट्यूबवर लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. ३२ देशांतील लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला आणि पोलीस विनाकारण दुसऱ्या लोकांवर कारवाई करत आहेत. हा व्हिडिओ ओरिजिनल आहे की मॉर्फ आहे, याची चौकशी पोलीस करतच नाहीत. ते फक्त कारवाई करत सुटले आहेत, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.
मी यासंदर्भात पोलीस आयुक्तांना भेटलो तेव्हा ते म्हणाले की, ‘ मी बिलकूल एकतर्फी कारवाई करणार नाही’. पण एका आमदाराच्या बंदुकीतून गोळी झाडली जाते. त्यानंतर पोलीस म्हणतात की, ‘गोळी झाडली तेव्हा बंदूक आमदाराच्या हातात नसावी. मग आपली रिव्हॉल्व्हर दुसऱ्याच्या हातात देणे हा गुन्हा ठरत नाही का?’ असा सवाल अंबादास दानवे यांनी विचारला. आमदाराचा व्हिडिओ डुप्लीकेट असेल तर जरुर कारवाई करा. पण तो ओरिजिनल असेल तर खासगी संबंध ज्याच्या त्याच्या घरी, सार्वजनिक ठिकाणी अशा गोष्टी होत असतील तर त्याच्यावरही गुन्हे दाखल झाले पाहिजेत. पण गृहमंत्रालय आणि सरकार गुन्हे करणाऱ्यांच्या बाजूने आहे की काय, अशी शंका घेण्यासारखी परिस्थिती राज्यात असल्याचे अंबादास दानवे यांनी म्हटले.