breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

अमोल कोल्हेंच्या नथुराम गोडसे भूमिकेवरील वादावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई |

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटावरुन वाद सुरु झाला आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी या चित्रपटामध्ये नथुराम गोडसेची भूमिका साकारल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही अमोल कोल्हेंच्या या भूमिकेचा विरोध केला आहे. दरम्यान या सर्व वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांनी अमोल कोल्हेंची पाठराखण केली असून कलाकार म्हणून त्यांनी ती भूमिका केली असल्याचं प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. “महात्मा गांधींवरील सिनेमा संपूर्ण जगात गाजला होता. त्या चित्रपटातही कोणीतरी नथुराम गोडसेची भूमिका केली होती. ती भूमिका ज्याने केली तो कलाकार होता, तो काही नथुराम गोडसे नव्हता. कोणत्याही चित्रपटात कलाकार एखादी भूमिका करत असेल तर कलाकार म्हणूनच त्याच्याकडे पहावं लागेल,” असं शरद पवार म्हणाले.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “छत्रपती शिवाजी महाराजांवरील आधारीत चित्रपटात एखाद्या अभिनेत्याने औरंगजेबाची भूमिका केली म्हणजे तो मुघल साम्राज्याचा पुरस्कर्ता होत नाही. कलावंत म्हणून तो भूमिका घेतो. किंवा रामराज्यासंबंधी सिनेमा असेल तर त्यात राम आणि रावण यांच्यातील संघर्ष दाखवला असेल तर तर रावणाची भूमिका करणारी व्यक्ती रावण असू शकत नाही. एक कलाकार म्हणून त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. म्हणजे सीतेचं अपहरण केलं याचा अर्थ प्रत्यक्ष सीतेचं अपहरण त्या कलाकारने केलं असा होत नाही. रावणाचा इतिहास त्यातून दाखवण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे अमोल कोल्हेंनी यासंबंधीची भूमिका घेतली असेल तर ती कलावंत म्हणून आहे”.

“अमोल कोल्हेंनी २०१७ मध्ये ही भूमिका केली तेव्हा ते आमच्या पक्षातही नव्हते. हा सिनेमा अजून बाहेरही आलेला नाही. पण कलावंत म्हणून त्यांनी ती भूमिका केली असेल तर याचा अर्थ गांधींजींच्या विरोधात काहीतरी आहे असा नाही. नथुराम गोडसेने जे काम केलं आहे त्यामुळे संपूर्ण देश अस्वस्थ, नाराज, दु:खी आहे. त्या नथुरामचं महत्व वाढवण्याचा यात कोणताही हेतू नाही. याकडे एक कलावंत म्हणून आणि या देशात घडलेला इतिहास समोर ठेवून पहायला पाहिजे,” असं शरद पवारांनी सांगितलं. भाजपा नेत्यांकडून होणाऱ्या टीकेसंबंधी बोलताना टोला लगावत ते म्हणाले की, “भाजपा नेते गांधीवादी कधीपासून झाले. भाजपा आणि आरएसएसच्या इतिहासावर मी भाष्य करु इच्छित नाही. पण एक काळ असा होता की गांधींच्या संबंधी वेगळी भूमिका घेणाऱ्या ज्या शक्ती होत्या त्या कुठे आहेत ते बघितलं पाहिजे. त्यानंतर त्यांनी बोलावं”. आव्हाडांच्या टीकेसंबंधी विचारण्यात आलं असता त्यांनी त्यांचं मत मांडलं असं शरद पवार म्हणाले. तसंच मी कोणत्याही कलावंताचा सन्मान करतो असंही म्हणाले.

  • अमोल कोल्हेंनी काय बाजू मांडली आहे?

“२०१७ साली या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. ज्यावेळी कोणत्याही सक्रिय राजकारणात नसताना मी ही भूमिका साकारली होती. एखादी भूमिका करतो म्हणजे त्या विचारधारेसोबत सहमत असतो असे कलाकार म्हणून कधीच नसते. काही विचारांसोबत आपण सहमत असतो. तर काही विचारधारांसोबत सहमत नसतानाही आपण ती भूमिका करतो. माझ्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक आयुष्यातसुद्धा नथुराम गोडसेचे उदात्तीकरणाच्या संदर्भात मी कधीही भूमिका घेतलेली नाही. केवळ एक कलाकार म्हणून भूमिका साकारणे आणि त्याचा राजकीय विचारांसोबत संबंध जोडला जाणे या दोन विभिन्न गोष्टी आहेत,” असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत.

  • कधी प्रदर्शित होणार हा चित्रपट?

अमोल कोल्हे यांच्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ चित्रपटाचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट ३० जानेवारी २०२२ ला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. यावर अमोल कोल्हे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून या चित्रपटाचे शूटिंग आपण राजकारणात येण्याच्या आधीच झाले होते असे त्यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button