15 पक्षांच्या प्रमुख नेत्यांसोबत भाजपविरोधी आघाडीसाठी शरद पवार आज घेणार महत्वाची बैठक
नवी दिल्ली – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी सोमवारी दुसऱ्यांदा भेट घेतली व त्यांच्यात राजकारणातील काही महत्त्वाच्या विषयांवर तब्बल दोन तास चर्चा झाली. या भेटीनंतर शरद पवार हे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधी आघाडी स्थापन करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.
शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीनंतर आज दुपारी 04 वाजता 6-जनपथ, दिल्ली येथील शरद पवार यांच्या निवासस्थानी देशातील 15 पक्षांच्या नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक होणार आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपवर विजय मिळवण्यासाठी सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी शरद पवार पुढे सरसावत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांच्या मदतीने भाजपविरोधी सर्व पक्षांची एकत्रित मोट बांधून 2024 ला भाजपला शह देण्याचा प्रयत्न असल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या विजयामागे प्रशांत किशोर यांचीच रणनीती कामी आली होती. त्यातच गेल्या दहा दिवसात शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या दोन वेळा भेट झाल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच आज दुपारी 15 पक्षांच्या नेत्यांसोबत दिल्लीत बैठक होणार असल्याने सर्वांचं या बैठकीकडे लक्ष लागलं आहे.