breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

हिंजवडीतील ‘कोंडी’ सोडविण्यासाठी शंकर जगताप सरसावले!

पीएमपीच्या एसी व आरामदायी बसेस सुरू करा : व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय कोलते यांना निवेदन

पिंपरी | हिंजवडीतील आयटी पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यांवर दररोज होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी जुनी सांगवी ते पिंपळेसौदागर रहाटणीमार्गे हिंजवडी, चिंचवडगाव ते वाल्हेकरवाडी, रावेतमार्गे हिंजवडी आणि चिंचवडगाव ते काळेवाडी, थेरगावमार्गे हिंजवडी या तीन मार्गावर वातानुकूलित (एसी) आणि आरामदायी इलेक्ट्रिकल विशेष बसेस सुरू करावेत, अशी मागणी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी पीएमपीएमएलकडे केली आहे. तसेच सर्व मेट्रो स्थानकांकडे जाणाऱ्या सर्व फीडर रुटवर दर १५ मिनिटांनी एक बस धावेल याचे नियोजन करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

यासंदर्भात भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय कोलते यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले आहे. त्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे, “पिंपरी-चिंचवड हे वेगाने विकसित होणारे शहर आहे. शहराच्या सर्वच भागात गेल्या पाच वर्षात मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढलेली आहे. शहराला लागूनच आंतरराष्ट्रीय दर्जाचे हिंजवडी आयटी उभे आहे. या आयटी पार्कमधील आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणारे अभियंते, कर्मचारी पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या भागात मोठ्या संख्येने वास्तव्य करीत आहेत. या कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी वाकड, हिंजवडी या भागात दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे.

हेही वाचा     –      सद्गुरूनगर येथील सेवा रस्त्याच्या कामाला अखेर ‘ग्रीन सिग्नल’

हिंजवडीकडे जाणाऱ्या मार्गावर पीएमपीएमएलमार्फत वातानुकूलित आणि आरामदायी बसेस मोठ्या संख्येने उपलब्ध करून दिल्यास वाहतूक कोंडी सोडविणे शक्य होईल. त्यानुसार जुनी सांगवी ते नवी सांगवी, वसंतदादा पुतळा, सुदर्शन नगर, पिंपळे सौदागर, रहाटणी, कस्पटेवस्तीमार्गे हिंजवडी, चिंचवडगाव येथून वाल्हेकरवाडी, रावेत, मुकाई चौक मार्गे हिंजवडी आणि चिंचवडगाव ते काळेवाडी, थेरगाव वाकडमार्गे हिंजवडी या तीन मार्गावर वातानुकूलित आणि आरामदायी इलेक्ट्रिक बस तातडीने सुरू करण्यात यावी. तशी या भागातील प्रवाशांची आणि नागरिकांचीही मागणी आहे.

त्याचप्रमाणे पिंपरी ते शिवाजीनगर सिव्हिल कोर्ट, पुणे आणि वनाज या मार्गावर मेट्रो सेवा सुरु झाली आहे. पिंपरी-चिंचवडमधील सर्व मेट्रो स्थानकांना प्रत्येक १५ मिनिटांनी एक बस याप्रमाणे पीएमपीएमएल बसेसद्वारे जोडणे आवश्यक आहे. पिंपरी येथील मेट्रो स्थानकासाठी चिंचवडगाव, आकुर्डी, काळेवाडी, केएसबी चौक, रावेत, बिजलीनगर, संभाजीनगर, शाहूनगर, अजंठानगर आदी भागातून तसचे संत तुकारामनगर मेट्रो स्थानकासाठी पिंपरीगाव, नेहरूनगर, स्पाईनरोड, सेक्टर क्रमांक ११, १३, १६, चिखली, कुदळवाडी, मोशी-बोर्‍हाडेवाडी आदी परिसरातून, कासारवाडी-भोसरी मेट्रो स्थानकासाठी पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, वाकड, कोकणे चौक, भोसरी, इंद्रायणीनगर, संतनगर, मोशी, दिघी या परिसरातून, फुगेवाडी मेट्रो स्थानकासाठी पिंपळे गुरव, नवी सांगवी या परिसरातून, दापोडी मेट्रो स्थानकासाठी जुनी सांगवी, पिंपळे निलख या परिसरातून प्रत्येक १५ मिनिटांनी एक याप्रमाणे बससेवा सुरु करावी. त्याचे नियोजन लवकरात लवकर तयार करून त्यावर कार्यवाही व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.”

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button