‘शरद पवारांनी जे पाप केलं ते त्यांना आता फेडायला लागत आहे’; डॉ. शालिनीताई पाटील यांची खोचक टीका
![Shalinitai Patil said that Sharad Pawar is now having to pay for the sin he committed](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/Shalinitai-Patil-and-sharad-pawar-780x470.jpg)
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आहे. अजित पवार यांनी बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. शरद पवारांनी जे पाप केलं ते त्यांना आता फेडायला लागत आहे, असा टोला डॉ. शालिनीताई पाटील यांनी लगावला आहे.
डॉ. शालिनीताई पाटील म्हणाल्या की, स्व. वसंतदादा पाटील यांचे चांगले चाललेले सरकार स्वार्थासाठी पाडणाऱ्या शरद पवार यांना आता अजित पवारांमुळे पाठीत खंजीर खुपसणे काय असते. याचा चांगलाच अनुभव आला असेल. राज्यात १९७८ मध्ये वसंतदादा पाटील हे काँग्रेसचे सरकार चालवत होते. या सरकारमध्ये पवार एक मंत्री होते. हे सरकार चांगले चाललेले असताना आपल्या स्वार्थासाठी, राजकीय महत्वाकांक्षेसाठी पवारांनी वसंतदादांचे सरकार पाडले. ज्यांच्यावर वसंतदादांनी विश्वास ठेवला त्याच शरद पवारांनी त्यांना दगा दिला. यानंतरच पवारांबद्दल सार्वजनिक जीवनात कायम पाठीत खंजीर खुपसणे हा शब्दप्रयोग वापरला जाऊ लागला. वसंतदादांना पवारांनी त्यांच्या उतार वयात दिलेला हा त्रास होता. याचा अनुभव आता पवारांना आला असेल.
हेही वाचा – मुंबईत १३ जुलैपर्यंत सुरक्षेच्या कारणास्तव जमावबंदीचे आदेश
आज पवारांना हा अनुभव कुणा दुसऱ्याकडून नाहीतर त्यांच्याच सख्ख्या पुतण्याकडून आलेला आहे. ज्याला हाताला धरून राजकारणात मोठे केले त्या पुतण्याने बंडखोरी करत पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. जे पेरले ते उगवले आहे. आपण इतिहासात केलेल्या कृत्यांमुळे त्यावेळी वसंतदादांना व त्यांच्या कुटुंबीयांना जो काही त्रास झाला, तो स्वत:ला आता कसा होतो, हे शरद पवार यांना अनुभवायला मिळाले असेल. जे पाप करायचे, ते येथेच फेडायचे, शरद पवार यांना या वयात पाप फेडावे लागले आहे, नियतीचा हा नियम आहे, असं शालिनीताई पाटील म्हणाल्या.
राज्यात बंडखोरीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवार यांनीच केली. वसंतदादांना त्यांनी संपवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यानंतरही ते मुख्यमंत्री झाले. काँग्रेस पक्षाने त्यांना पुढे पदे दिली. पक्ष पाठीशी राहिला. यांनी काँग्रेस पक्षाशी वेळोवेळी गद्दारीच केली. त्यामुळे त्यांच्याबद्दल पुरोगामी पक्षांनी सहानुभूती बाळगण्याची अजिबात गरज नाही. विविध घोटाळे आणि साखर कारखान्यांच्या खरेदीच्या चौकशांमधून सुटण्यासाठीच काकाच्या पाठीत पुतण्याने खंजीर खुपसला. शरद पवार यांचा आदर्शच त्यांच्या पुतण्याने घेतला आहे. आजवर ज्यांच्या पाठीत खंजीर खुपसले तेच फिरून पवारांसमोर आल्याने आज खऱ्या अर्थाने स्व. वसंतदादा पाटील यांच्या आत्म्याला शांती लाभली आहे. आजवरचे विश्वासघातकी राजकारण करणे हेच पवारांना नडले असून, राष्ट्रावादी काँग्रेसमधील बंडाळीला शरद पवार हेच जबाबदार, असंही शालिनीताई पाटील म्हणाल्या.