सांडपाण्यावर प्रक्रिया न करणाऱ्या हॉटेलवर कारवाई करा : अजित पवार
खडकवासला धरण परिसरातील हॉटेल आणि रिसॉर्टवर कारवाई करावी
![Sewage, untreated, hotels, take action, Ajit Pawar,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/10/ajit-pawar-1-1-780x470.jpg)
पुणे ः राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत पुणे महानगरपालिका क्षेत्रातील विकासकामांचा आढावा घेतला. महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने सांडपाणी आणि कचऱ्यावर प्रक्रिया न करणाऱ्या खडकवासला धरण परिसरातील हॉटेल आणि रिसॉर्टवर कारवाई करावी, असे निर्देश पवार यांनी यावेळी दिले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील गावातून धरणात येणाऱ्या अशुद्ध पाण्याबाबत माहिती घेतली. धरण परिसरात असलेल्या गावातून येणाऱ्या सांडपाण्यासाठी भूमिगत गटार आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी प्रस्ताव तयार करावा. धरण परिसरातील २४ गावातील सांडपाणी व कचरा व्यवस्थापनाबाबत पीएमआरडीएने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करावा. विभागीय आयुक्तांनी स्वतंत्र बैठक घेऊन तात्काळ करावयाच्या उपाययोजनांची रुपरेषा तयार करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामाच्या सद्यःस्थितीबाबतही यावेळी आढावा घेण्यात आला. रस्त्याच्या कामासाठी भूसंपादन प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी. पिसोळी गावापासून रस्ता रुंदीकरणाबाबतही कार्यवाही करावी. शाळा, महाविद्यालय आणि कार्यालयीन वेळ लक्षात घेऊन सकाळी आणि संध्याकाळी २-२ तास कात्रज-कोंढवा रस्त्यावरील जड वाहतूक बंद ठेवावी,असे निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.