“भास्कर जाधव, सुषमा अंधारे आणि आदित्य ठाकरे यांचा डोंबाऱ्याचा खेळ आहे”; शिंदे गटातील नेत्याची टीका
![Sanjay Shirsath said that Bhaskar Jadhav, Sushma Andhare and Aditya Thackeray are playing a game of bull](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/aditya-thackeray-sushma-andhare-and-bhaskar-jadhav-780x470.jpg)
आदित्य ठाकरेंच्या मानगुटीवर अहंकाराचं भूत बसलंय
मुंबई : आज ज्या सभा सुरू आहेत त्या डोंबाऱ्याचा खेळ आहे. त्या रस्सीवरचे पात्र बदलतात. कधी भास्कर जाधव, कधी सुषमा अंधारे तर कधी आदित्य ठाकरे, रस्सीवर उड्या मारतात आणि लोकांनी टाळ्या वाजवल्या तर आपल्याला फार दाद देतात असं त्यांना वाटते. हे काही दिवस चालणारे नाटक आहे, अशी टिका शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटावर केली आहे.
आदित्य ठाकरेंच्या मानगुटीवर अहंकाराचं भूत बसलंय, त्यांचा अहंकार एवढा वाढलाय, आमदार गेले, सत्ता गेली, पक्ष संपत चालला तरी अहंकार संपत नाही. अहंकार वाढवण्यामागे जी भूमिका आहे ती संजय राऊत पेट्रोल टाकून वठवतायेत. आदित्य ठाकरेंच्या विधानाला जास्त महत्त्व देण्याचं कारण नाही. राजकारणाची सुरुवात दोन चांगल्या कार्यकर्त्यांच्या छाताडावर पाय ठेऊन चढलेली पहिली पायरी होती, असा टोला संजय शिरसाट यांनी आदित्या ठाकरेंना लगावला.
वरळी हा त्यांचा मतदारसंघ नाही. सचिन अहिर, सुनील शिंदे यांच्या छाताडावर पाय ठेऊन ते पहिली पायरी चढलेत, हे ते विसरलेत. म्हणून त्यांच्या आव्हानाला महत्त्व देण्याचं कारण नाही. राजकारणात एक निवडणूक जिंकली म्हणजे आपण सर्वकाही जिंकलं असे त्यांना वाटते. आम्ही अनेक निवडणुका जिंकल्यात तरी आमच्यात हा अहंकार आला नाही, असंही संजय शिरसाट म्हणाले.