‘व्वा!, क्या सीन है”, नक्की कोण कुणाचा आका?’, संजय राऊतांचा वाल्मिक कराडांच्या ‘आका’वरून सवाल

मुंबई | बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण आणि नंतर हत्या झाल्याचे प्रकरण चांगलेच तापले आहे. या घटनेला २०हून अधिक दिवस उलटले आहेत, मात्र अद्यापही या प्रकरणातील काही आरोपींना अटक करण्यात आलेली नसल्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. विरोधी पक्षांकडून या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार हा वाल्मिक कराड असल्याचे सांगितले जात आहे. यादरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक फोटो पोस्ट करत काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
खासदार संजय राऊत यांनी वाल्मिक कराड याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतचा कथित फोटो पोस्ट केला आहे. व्वा! क्या सीन है? नक्की कोण कुणाचा आका?, असं कॅप्शन या फोटोला दिले आहे.
हेही वाचा – ‘महाकुंभ हा एकतेचा संदेश’; ‘मन की बात’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य

संजय राऊतांनी पोस्ट केलेल्या फोटोवर काही मजकूर लिहिलेला आहे. यामध्ये म्हटलंय की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर फोटोत असणारा खंडणीखोर, खुनी, गावगुंड (वाल्मिक कराड) पोलिसांना सापडत नाही. एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी किती पारदर्शक होईल. हाय का नाही मोठा जोक?.
दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याच्या अटकेची मागणी होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्यावरही टीका केली जात आहे. याप्रकरणी धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली जात आहे.





