‘आम्हाला बाहेरून सलीम-जावेद लागत नाहीत’; संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला
राज ठाकरेंचं परवाचं भाषण स्क्रिप्टेड होतं
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मुंबईतील शिवाजी पार्कवर मेळावा पार पडला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जंगी सभा झाली. या सभेत राज ठाकरेंनी शिवसेना, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. दरम्यान, राज यांची सभा स्क्रिप्टेड होती, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
विधीमंडळाबाहेबची उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातली भेट स्क्रिप्टेड होती असा मनसेने आरोप केला आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले की, जसं की, त्यांच्या नेत्यांचं परवाचं भाषण स्क्रिप्टेड होतं. मी सर्वत्र तेच ऐकतोय आणि वाचतोय.
राजकारणात शिवसेनेला स्क्रिप्टेड काही करण्याची गरज नाही. आम्हाला बाहेरून सलीम-जावेद लागत नाहीत. आम्ही समर्थ आहोत. आम्ही स्वतंत्र बुद्धीने काम करतो, विचार करतो. आमचा पक्ष स्वत:च्या पायावर उभा आहे. दुसऱ्यांची डोकी आम्हाला कामासाठी लागत नाहीत, असं संजय राऊत म्हणाले.