‘महाविकास आघाडीचं जागावाटप पूर्ण’; संजय राऊतांचा विधान
![Sanjay Raut said that seat allocation of Mahavikas Aghadi is complete](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/03/Sanjay-Raut-1-1-780x470.jpg)
मुंबई | भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी त्यांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातल्या २० जणांची नावं आहेत. त्यामुळे महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार किमान २० जागा भाजपाच्या पारड्यात पडल्याचं स्पष्ट झालं आहे. महाविकास आघाडीचं जागावाटप कसं असेल? यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले की, महायुतीमध्ये जागावाटपाबाबत अजिबात संभ्रम नाही. ४८ मतदारसंघांची पूर्ण यादी एकत्र जाहीर केली जाईल. जागावाटप पूर्ण झालं आहे. कलाबेन डेलकर यांचं नाव भाजपाच्या यादीत आहे. तरी ती जागा शिवसेना लढणार आहे. त्या संकटात असताना त्या कुटुंबाला शिवसेनेनंच साथ दिली. अशा स्थितीत त्या कुटुंबाला इमान नसेल, निष्ठा नसेल तर बघू, असं ते म्हणाले.
हेही वाचा – भाजपने उमेदवार यादी जाहीर करताच घडामोडींना वेग
महाविकास आघाडी, इंडिया आघाडी आम्ही सगळे एक आहोत. राहुल गांधी महाराष्ट्रात आले आहेत. आज ते चांदवडमध्ये शेतकरी मेळावा घेत आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, इतर सर्व घटक पक्षांनी त्या मेळाव्यात उपस्थित राहण्याचं ठरलं आहे. १७ तारखेला मुंबईत समारोप आहे. शिवाजी पार्कवर स्वत: उद्धव ठाकरे उपस्थित राहतील. काल राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली. शिवाजी पार्कच्या मेळाव्याबाबत ते बोलले. राहुल गांधींनी उद्धव ठाकरेंना खास निमंत्रण दिलं आहे. आज नाशिकमध्ये शिवसेना मोठ्या उत्साहात त्यांचं स्वागत करणार आहे, असं संजय राऊत म्हणाले.