‘बाळासाहेबांना भारतरत्न दिलात तर तो सावरकरांचाही गौरव ठरेल’; संजय राऊत
![Sanjay Raut said that if Balasaheb is given Bharat Ratna, it will be a glory for Savarkar too.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/01/Sanjay-Raut-said-that-if-Balasaheb-is-given-Bharat-Ratna-it-will-be-a-glory-for-Savarkar-too.-780x470.jpg)
मुंबई | प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या तत्वाशी कधीही तडजोड न करणाऱ्या बाळासाहेबांची वैचारिक कटिबद्धता सदैव प्रेरणा देत राहील, असं म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले, की त्यांना (अमित शाह) बाळासाहेब ठाकरे माहीतच नाहीत. आम्ही प्रतिकूल परिस्थिती काय झुंज दिली हे अमित शाहांना माहितच नाही. या प्रतिकूल परिस्थितीत आम्ही अमित शहांविरोधातही झुंज देत आहोत. अमित शाहांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेची जी परिस्थिती केलीय, या प्रतिकूल परिस्थितीशी सामना करून संघर्ष करत आम्ही उभे आहोत, ही आम्हाला दिलेली बाळासाहेबांची प्रेरणा आहे. मतांसाठी त्यांचं नाव घेतलं म्हणजे ती प्रेरणा ठरत नाहीत. बाळासाहेब ठाकरे कृतीशील हिंदूह्रदय सम्राट होते. हातात कोणतीही सत्ता नसातना लढा दिला आणि त्याचे परिणाम भोगले. सत्ता नसताना मराठी माणसासाठी लढा दिला. शिवसेनेसारखी कवच कुंडलं तयार केली. ही कवच कुंडलं अमित शाहांनी आणि नरेंद्र मोदींनी तोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याचा अधिकार नाही.
हेही वाचा : त्रिवेणीनगर स्पाईन रोडच्या भूसंपादनाला ‘बुस्टर’
बाळासाहेबांचा एक विचार हता. बाळासाहेबांना ढोंग आवडत नव्हतं. ते ढोंगावर हल्ला करणारे नेते होते. या देशात हिंदूत्वाच्या नावावर ढोंग सुरू आहे, याचा प्रतिकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेना करतेय. अमित शाह आणि नरेंद्र मोदींना माझं आव्हान आहे, हे ढोंगं बंद करा, हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा भारतरत्न सन्मानाने गौरव करा. गेल्या काही काळात मोदी शाहा आल्यापासून राजकीय स्वार्थासाठी नियम डावलून भारतरत्न दिलं जातंय. पण ज्याने या देशात हिंदूत्त्वाचं बिज रोवलं आणि वाढवलं त्या बाळासाहेब ठाकरेंना अजून भारतरत्न का दिलं नाही. २०२६ ला जन्मशताब्दी वर्ष सुरू होणार आहे, त्याआधी त्यांना भारतरत्न दिला गरजेचं आहे. तुम्ही वीर सावरकरांना भारतरत्न देऊ शकला नाहीत. त्यामुळे बाळासाहेबांना भारतरत्न दिलात तर तो सावरकरांचाही गौरव ठरेल, असंही संजय राऊत म्हणाले.