breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘काँग्रेसने दिल्लीवर लक्ष ठेवावे, गल्लीतल्या राजकारणात पडू नये’; संजय राऊतांचा सल्ला

सांगली | सांगली लोकसभेच्या जागेवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात रस्सीखेच सुरू आहे. शिवसेना उबाठा गटाने चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करून प्रचारालाही सुरूवात केली आहे. त्यावरुन काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. यावरून ठाकरे गटाचे खासादर संजय राऊत यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसने दिल्लीवर लक्ष ठेवावे, गल्लीतल्या राजकारणात पडू नये, असा सल्ला राऊत यांनी दिला.

खासदार संजय राऊत म्हणाले की, संपूर्ण देशात एक चांगले वातावरण निर्माण झालेले आहे. सांगलीची जागा हा काँग्रेससाठी वादाचा विषय होऊ शकत नाही. सांगलीची जागा महाविकास आघाडीची आहे. तसेच महाराष्ट्रातील ४८ जागा कोण्या एका पक्षाच्या नसून त्या महाविकास आघाडीच्या जागा आहेत. महाविकास आघाडी म्हणून जर आम्ही एकत्र लढलो, तर त्याचे चांगले परिणाम दिसतील. याचा फायदा काँग्रेसलाच केंद्रात होऊ शकतो. सांगलीची लढाई सुद्धा काँग्रेसचा पंतप्रधान व्हावा यासाठी आहे. काँग्रेसला त्यांचा पंतप्रधान नको असेल तर त्यांनी तसे जाहीर करावे.

हेही वाचा    –    ‘एकनाथ खडसे भाजपमध्ये येतील, तेव्हा..’; गिरीश महाजनांचं मोठं विधान

काँग्रेसचा पंतप्रधान बनवण्यासाठी एक एक जागा निवडून आणणे गरजेचे आहे. राष्ट्रीय पक्षाने राष्ट्रीय पातळीवरील राजकारण करावे, गल्लीत फार लक्ष घालू नये. आला तर तुमच्याबरोबर नाहीतर तुमच्या शिवाय निवडणूक लढवली जाईल. हिंदकेसरीने गल्लीतली कुस्ती खेळू नये. तुम्ही राष्ट्रीय पक्ष आहात, त्या उंचीवर राहा. सांगलीतले आम्ही बघून घेऊ, असं संजय राऊत म्हणाले.

इंडिया आघाडीमध्ये शिवसेना किंवा शरद पवार हे पंतप्रधान बनणार नाहीत तर काँग्रेसचाच पंतप्रधान बनणार आहे. मग अशा परिस्थितीत रुसवे फुगवे योग्य नाहीत. अन्य मतदारसंघ आम्ही जिंकत असून सुद्धा ते काँग्रेसला दिले मग सांगली बाबत नाराजी असण्याचे काही नाही.

सांगली आणि भिवंडी या दोन मतदारसंघाचे विषय आता संपले आहेत. भिवंडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला उमेदवार जाहीर केला असून प्रचारही सुरू केला आहे. आम्हीही राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला असून त्यांचा प्रचार करणार आहोत. तसे काँग्रेसने आमच्या उमेदवाराला पाठिंबा देऊन त्यांच्या पाठिशी उभे राहायला हवे. रामटेकमध्ये आमचा विद्यमान खासदार होता. तरीही हा मतदारसंघ आम्ही काँग्रेसला दिला. कोल्हापूर मतदारसंघात छत्रपती शाहूंना पाठिंबा दिला. अमरावतीची जागा शिवसेना ३० वर्षांपासून लढत आहे. तीही आम्ही काँग्रेसला दिली. त्यामुळे सांगलीबाबत काँग्रेसने एवढा तिढा निर्माण करू नये. आम्ही आता मैदानात उतरलो आहोत. आलात तर तुमच्याबरोबर नाहीतर तुमच्या शिवाय हे आमचे धोरण आहे, त्यानुसार शिवसेना आतापर्यंत वाटचाल करत आला आहे, असंही संजय राऊत म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button