‘अजित पवारांनी पक्ष बदलला नाही तर चोरला’; संजय राऊतांचा टोला
![Sanjay Raut said that Ajit Pawar did not change the party but stole it](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/Sanjay-Raut-and-Ajit-Pawar-780x470.jpg)
मुंबई | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरूवारी एक व्हिडीओ ट्वीट करत आपण राजकारणात आल्यापासून पक्ष बदललेला नाही, भ्रष्टाचाराचा एकही आरोप सिद्ध झाला नाही असा दावा केला. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. अजित पवारांनी पक्ष बदलला नाही तर चोरला, असा टोला त्यांनी अजित पवार यांना लगावला आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले, अजितदादांनी पक्ष बदललेला नाही, पण आपल्या काकांचा मुळ पक्ष चोरला. त्याबद्दल त्यांना खंत आणि खेद वाटला पाहिजे. त्यांनी सरळसरळ केलेले पक्षांतर असून मोदी-शहा नसते तर हा पक्ष त्यांच्या ताब्यात आला नसला. मोदी-शहा यांचा महाराष्ट्रद्रोह उफाळला नसता तर बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना धनुष्यबाणासह शिंदेंना मिळाली नसती. त्यामुळे जपून बोला, लोकं ऐकताहेत आणि त्यांना समजतंय, असा टोला राऊतांनी लगावला.
हेही वाचा – युवा परिवर्तनमध्ये एक्सेंचरसोबत प्राईड मंथ साजरा
हाथरस घटनेवरून संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. देशाचा पंतप्रधानच सर्वात मोठा बुवा असून भोंदुगिरी तिथूनच सुरू होते. मोदींनी पंतप्रधानांसारखे वागायला पाहिजे. पण ते गुहेत जाऊन तपस्या करतात. स्वत:ला बाबा, महाराज म्हणून घेतात. स्वत:ला देवाचा अवतार म्हणवून घेतात. माझा जन्म बायोलॉजीकल पद्धतीने झाला नाही असे सांगतात. हिंदू-मुसलमान करतात. ही भोंदुगिरी, बुवाबाजी आहे. देशाचा पंतप्रधानांनाच भोंदुगिरीतून राजकारण करायचं असेल काय करणार, अशी टीका राऊत यांनी केली.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ४० आमदारांना घेऊन आसामला जातात आणि कामाख्य देवीच्या मंदिरात रेडे कापतात. यांच्यावर कोण कारवाई करणार? जिथे अंधश्रद्धा, बुवाबाजी आहे तिथे राज्यकर्ते, राजकारणी जातात. पंतप्रधान असो की मुख्यमंत्री, त्यांच्यावरही अंधश्रद्धा निर्मुलन कायद्यांतर्गत कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही संजय राऊत यांनी केली.