मंत्री नरहरी झिरवळ यांच्या लिपिकास मंत्रालयात लाच घेताना अटक

मुंबई | राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) छापा टाकत दोन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले. कार्यालयातील लिपिक राजेंद्र ढेरंग याने ५० हजार रुपयांची लाच मागितली आणि त्यातील ३५ हजार रुपये स्वीकारत असताना त्याला पकडण्यात आले. या सर्व घटनेवर आता मंत्री नरहरी झिरवाळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले, मी दोन दिवसांपासून दिल्लीत आहे. काल जो काही प्रकार झाला, तो अतिशय चुकीचा होता. असे व्हायला नको होते. राजेंद्र ढेरंग हे लिपिक म्हणून काम करतात. सुनावणीचे कागदपत्र तयार करण्याचे काम त्यांच्याकडे आहे. ते मुळचे अन्न व नागरी पुरवठा विभागाचे कर्मचारी आहेत. त्यांना उसनवारीवर या विभागात घेतले होते. त्यांच्याकडून हा प्रकार घडला. या प्रकाराला कुठेही पाठिशी घालणार नाही.
माझ्यासमोर या कर्मचाऱ्याची तक्रार यापूर्वी कधी आली नव्हती. लाचेची रक्कम कितीही असली तरी सरकारी कर्मचाऱ्याने अशाप्रकारे पैसे घेणे चुकीचेच आहे. पैसे घेतले आहेत तर त्याची शिक्षा आता संबंधित व्यक्तीला भोगावी लागेल, असं नरहरी झिरवाळ म्हणाले.
तुमच्यापर्यंत या प्रकरणाचे धागेदोरे येत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत, असा प्रश्न विचारला असता मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले की, तसे जर माझ्यापर्यंत धागेदोरे येत असतील आणि ते सिद्ध होत असेल तर त्याची जबाबदारी घेण्यास मी तयार असेन. या भ्रष्टाचाराचे माझ्याशी संबंध असल्याचे सिद्ध झाले तर मी राजीनामा देईन, असेही मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले.




