सांगलीची जागा ठाकरे गटाला, काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक
![Sangli seat to Thackeray group, Congress workers are aggressive](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/04/Uddhav-Thackeray-and-Vishal-Patil-780x470.jpg)
सांगली | महाविकास आघाडीचं अखेर जागा वाटप जाहीर झालं आहे. महाविकास आघाडीत ठाकरे गट २१, काँग्रेस १७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट १० जागांवर लढणार आहे. या यादीमध्ये सांगलीची जागा ठाकरे गट लढणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. त्यामुळे आता सांगलीतील स्थानिक काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी व नेते आक्रमक झाले आहेत. विशाल पाटील यांच्या कार्यकर्त्यांच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.
उद्धव ठाकरेंनी सांगलीतून चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा केली होती. मात्र, काँग्रेसने या उमेदवारीला विरोध दर्शवला होता. सांगलीतून काँग्रेसमधून विशाल पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा पाहायला मिळत होती. आमदार विश्वजीत कदम हे विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी आग्रही असल्यााचं पाहायला मिळालं. मात्र, अंतिम जागावाटपात सांगलीची जागा ठाकरे गटालाच मिळाली आहे. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
हेही वाचा – विलास लांडेंची नाराजी दूर, शिवाजीराव आढळराव पाटलांचे पारडे जड
सांगलीच्या जागेच्या निर्णय झाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हायकमांडच्या आदेशाच सगळे पालन करतील. लोकशाही, संविधान वाचवण्याची ही निवडणूक आहे. त्यांचं समाधान आम्ही करु. आजचा दिवस हा गुढी पाडव्याचा दिवस आहे. महाराष्ट्राच्या जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. मविआने जे निर्णय घेतले ते महाराष्ट्राच्या हिताचे, शेतकरी, तरुण, गरीब वर्ग यांचं हित डोळ्यासमोर ठेऊन घेतले, असं ते म्हणाले.