‘शरद पवार सैतान, काळ सूड उगवतोय’; सदाभाऊ खोत यांची खोचक टीका
![Sadabhau Khot said that Sharad Pawar satan is taking revenge](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/Sadabhau-Khot-and-sharad-pawar-1-780x470.jpg)
मुंबई : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरी खोचक टीका केली आहे.
सदाभाऊ खोत म्हणाले की, महाराष्ट्रातील राजकारण हे प्रस्थापितांकडे जात असल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीत यशवंतराव चव्हाण, सुधाकरराव नाईक, वसंतदादा पाटील यांचं मोठं योगदान आहे. ८० च्या दशकात महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांचा उद्य झाला. तिथून राजकारण्याच्या ऱ्हासाला सुरूवात झाली.
हेही वाचा – ‘आपल्या देशातील नेते अशिक्षित, ज्यांच्याकडे योग्य दृष्टीकोनही नाही’; बॉलिवूड अभिनेत्री काजोलचं विधान
या राजकारणात वाडे विरूद्ध गावगाडे, प्रस्तापित विरूद्ध विस्थापित असा संघर्ष शरद पवारांच्या कालखंडात उभा राहिला. गेल्या ५० वर्षात हे सुरू आहे. शरद पवारांनी सरदारांना बरोबर ठेवून राज्य केलं. त्या सरदारांनी शेतकऱ्यांची घरे लुटली. गावगाडा उद्ध्वस्त केला. ते सरदार आज सैरभैर पळत आहेत. शरद पवार यांच्यावर नियतीने मोठा सूड उगवला असून, त्यांना गावगाड्याकडे धावत यावं लागत आहे, असं सदाभाऊ खोत म्हणाले.
पुण्यात काका मला वाचवा ही हाक महाराष्ट्राला ऐकू आली होती. पण, आता नवीन हाक महाराष्ट्राला ऐकू येत आहे, की पुतण्यापासून मला वाचवा. जैसी करणी वैसी भरणी. पूर्वीच्या काळात बापाने पाप केल्यावर मुलाला फेडावं लागत होते. मात्र, कलयुगात जो पाप करतो, त्यालाच ते फेडावं लागते. शरद पवारांना हे पाप फेडावे लागणार आहे. भविष्यात हा सैतान गावगाड्यापर्यंत परत येता कामा नये, यासाठी आम्हा कार्यकर्त्यांना काम करावे लागणार आहे, असंही सदाभाऊ खोत म्हणाले.