मुलींवरील अत्याचार, आत्महत्यांसाठी पालकही जबाबदार; रूपाली चाकणकर
![Rupali Chakankar said that parents are also responsible for the abuse and suicide of girls](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/12/Rupali-Chakankar-780x470.jpg)
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत तीन मुलींनी आत्महत्या केल्या आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी नुकतीच सोलापूर जिल्ह्याला भेट देऊन पीडित कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत महिला आयोग काय करत आहे याची माहिती दिली. अत्याचार रोखण्यासाठई पोलिसांपेक्षा पालकांनी अधिक सतर्क राहावे, असेही त्यांनी सांगितले.
रूपाली चाकणकर म्हणाल्या, मला छोट्या भगिनींना सांगायचे आहे की, शालेय जीवन जगत असताना आपण अभ्यासाचा, उज्ज्वल भविष्यावर लक्ष केंद्रीत केले पाहीजे. वयाच्या १४ वर्षी एका हातात मोबाइल आणि दुसऱ्या हातात टीव्हीचा रिमोट असल्यामुळे हल्लीच्या मुली आभासी जगात वावरत असतात. कुणी दोन शब्द चांगलं बोललं तर त्याला भुलणं आणि नको त्या भुलथापांना बळी पडण्याच्या गोष्टी घडत आहेत. आई-वडील आपले वैरी आहेत की काय? अशी भावना हल्लीच्या मुला-मुलींमध्ये प्रकर्षाने दिसते. पालक चुकीचे सांगतात असे मानून मुलं-मुली पालकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे मुलं मोठी होत असताना पालकांनी संवादाची पद्धत बदलून मुलांना अधिक समजून घेतले पाहीजे.
हेही वाचा – केंद्र सरकारची मोठी कारवाई! जम्मू काश्मीरमधील मुस्लीम लीग मसरत गटावर बंदी
आज सोलापूर पोलीस आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेतली. सोलापूर शहरात गेल्या आठवड्यात दोन तरुणींनी आत्महत्या केल्याचे कळल्यानंतर राज्य महिला आयोगाने याची त्वरित दखल घेत सदर गुन्ह्याचा तपास जलद व्हावा म्हणून पोलीस आयुक्तांना पत्र दिले होते.1/2@solapurpolice @Info_Solapur pic.twitter.com/HGPkGYwnhR
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) December 26, 2023
मुलांना अपयश आले तरी त्यांना समजून घेतले पाहीजे. आत्महत्येचा निर्णय घेण्यापर्यंत मुलं कशी पोहोचतात? त्यांचे मन इतके कमकुवत का झाले? याचाही विचार पालकांनी करायला हवा. पोलिस किती ठिकाणी जाणार? काही ठिकाणी तर बापाकडूनच मुलींवर बलात्कार झाला आहे. मी स्वतः अशा नऊ प्रकरणांचा पाठपुरावा करत आहे. ज्याला बाप-लेकीच्या नात्याची विण माहीत नाही. ज्याला स्वतःच्या भावनांची समज नाही, त्यांचे सर्वांचे प्रबोधन करणे समाजाची जबाबदारी आहे, असं रूपाली चाकणकर म्हणाल्या.
राज्य महिला आयोग याआधी महाराष्ट्रात कुणालाही माहीत नव्हता. मी राज्यात फिरायला लागल्यानंतर महिला आयोगाची कामगिरी सर्वांना दिसत आहे. महिला अत्याचारापासून मानवी तस्करी रोखण्यापर्यंतची कामे आम्ही केली आहेत. पोलिस प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्याचे त्यांचे काम करत आहे. पण ज्यावेळीस जन्मदाता बाप मुलीवर बलात्कार करतो, तेव्हा कायदा व सुव्यवस्था काय करणार? चार भिंतीच्या बाहेर कायदा सुरू होतो, चार भिंतीच्या आत होते त्याचे काय करणार? असंही रूपाली चाकणकर म्हणाल्या.