भोंदूबाबाला सुपारी देणारे राजकीय राक्षस कोण? रोहित पवारांची पोस्ट चर्चेत

मुंबई | भोंदूगिरीच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या अशोक खरात प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे. पोलिसांनी खरातला अटक करून २४ दिवसांची कोठडी सुनावली असताना या प्रकरणाचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटू लागले आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या आधीच या प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडल्या असताना आता अजित पवार यांच्या संदर्भातही या भोंदूबाबाचे नाव पुढे येऊ लागले आहे. त्यामुळे राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.
आमदार रोहित पवार यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर (एक्स) पोस्ट करत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात भोंदुगिरीला स्थानही नाही आणि त्यावर कोणाचा विश्वासही नाही, परंतु आमदार अमोल मिटकरी म्हणत असल्याप्रमाणे अजितदादांच्या सहयोग सोसायटी येथील निवासस्थानाच्या बाहेर केलेला जादूटोणा तसेच देवगिरी बंगल्याबाहेर नाशिकच्या भोंदूबाबाबाच्या माध्यमातून जादूटोणा झाल्याची समोर येत असलेली माहिती बघता हे प्रकरण खूपच भयंकर दिसते.
हेही वाचा : रूपाली चाकणकर स्वतः तंत्रविद्या करत होत्या; सुषमा अंधारेंचे धक्कादायक आरोप
नाशिकच्या भोंदूबाबाने हा जादूटोणा केला तर मग या भोंदुबाबाबाला भोंदुगिरीची सुपारी देणारे राजकीय राक्षस कोण? त्यांचा या राक्षसी महत्त्वाकांक्षेचा राजकीय हेतू काय होता? या काळात अजितदादांच्या बंगल्यावर भोंदू खरात याच्याशी जवळीक असणारे कोण कोण आले? २७ जानेवारी रोजी संबंधित लोक देवगिरिवर आले होते का? याचा तपास होणे गरजेचे आहे. सुनेत्राकाकी, पार्थ आणि जय यांनी काळजी घ्यावी, कारण आजचं बेभरवशी राजकारण चांगलं राहिलेलं नाही, असंही रोहित पवार म्हणाले.





