मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपच्या रितू तावडे उमेदवार

मुंबई | मुंबई महापालिका निवडणुकांचा निकाल जाहीर होऊन पंधरा दिवसांहून अधिक काळ लोटल्यानंतर अखेर सत्ताधारी महायुतीकडून महापौर आणि उपमहापौर पदांची घोषणा करण्यात आली आहे. आज झालेल्या शिवसेना–भाजप संयुक्त बैठकीनंतर या दोन्ही महत्त्वाच्या पदांवरील नावांवर शिक्कामोर्तब झाले.
भाजपाकडून रितू तावडे यांची मुंबईच्या महापौरपदी निवड करण्यात आली असून, शिवसेनेकडून संजय घाडी यांना उपमहापौरपदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे. दोन्ही उमेदवारांनी आज आपले नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत.
मुंबई महापालिकेत शिवसेना आणि भाजपाने संयुक्तपणे निवडणूक लढवली होती. या युतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर महापौरपदावर दावा करण्यात आला होता. मात्र, महापौरपदावरून दोन्ही पक्षांमध्ये काही काळ मतभेद निर्माण झाले. अखेर चर्चा आणि बैठकीनंतर भाजपाला महापौरपद तर शिवसेनेला उपमहापौरपद देण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आला.
हेही वाचा : भारताची चित्तथरारक भरारी! ‘अग्नी-3’ची यशस्वी चाचणी; 5 किमी प्रति सेकंद वेग
महापौर व उपमहापौर पदासाठी नामनिर्देशन अर्ज भरण्याची अंतिम मुदत आज, ७ फेब्रुवारी रोजी संपत असून, त्याआधीच महायुतीने आपले उमेदवार जाहीर करत अर्ज दाखल केले आहेत. येत्या ११ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता महापौर पदासाठी निवडणूक होणार आहे.
दरम्यान, शिवसेना (ठाकरे) गटाकडून अद्याप अधिकृत उमेदवार जाहीर न झाल्याने महापौर निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता पालिकेत चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाच्या एकमेव नगरसेवकानेही महायुतीला पाठिंबा दिला आहे. आज दुपारी मातोश्रीवर ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होणार असून, त्या बैठकीनंतर विरोधक उमेदवार देणार की नाही, हे स्पष्ट होणार आहे.




