‘रेकॉर्ड ब्रेक’’ गर्दी : तब्बल 79 हजार पर्यावरण प्रेमींच्या साक्षीने ऐतिहासिक ‘‘रिव्हर सायक्लोथॉन’’
इंद्रायणी नदी स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी 51 हजार 300 हून अधिक सायकलपटू सहभागी
रिव्हर सायक्लोथॉन : आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतील उपक्रमाला पिंपरी-चिंचवडकरांचा तुफान प्रतिसाद
पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी । इंद्रायणी नदी स्वच्छतेचा जागर संदेश देण्यासाठी रविवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘रिव्हर सायक्लोथॉन 2025’ या भव्य उपक्रमाला यंदा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. वारकरी परंपरा आणि पर्यावरणसंवर्धनाचा संगम घडवणाऱ्या या उपक्रमात ‘शिव-शंभू यशोगाथा’ हा विशेष कार्यक्रम सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. शिवकालीन शौर्य, सांस्कृतिक वैभव आणि नदी संवर्धनाचा संदेश यांचा अनोखा मेळ यंदाच्या सायक्लोथॉनमध्ये पाहायला मिळाला.
‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’—धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक परिसरातून रविवार, दि. 23 नोव्हेंबर रोजी पहाटे 6 वाजता सायक्लोथॉनची सुरुवात झाली. आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून दरवर्षी आयोजित होणाऱ्या या उपक्रमाने यंदा नवा इतिहास रचला. यंदा सायक्लोथॉनचे 9 वे वर्ष होते. रणमर्द शिलेदारांचे संचलन, मर्दानी खेळ, ढोल-ताशांचा गजर आणि मशाल-दिवटी नृत्य यांच्या सादरीकरणांनी शिवराज्यकालीन पराक्रमाची जिवंत झलक उपस्थितांना अनुभवता आली.शिव-शंभू गर्जनेने परिसर दणाणून गेला.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त श्रावण हर्डिकर, माजी महापौर राहुल जाधव, नितीन काळजे, भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, धनश्री हॉस्पिटलच्या संचालक यांच्यासह विविध संस्था-संघटनांचे प्रतिनिधी, पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, अविरत श्रमदान संस्था, सायकल मित्र, WTE फाउंडेशन आणि महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही ऐतिहासिक सायक्लोथॉन संपन्न झाली.

जगातील सर्वात उंच ‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’ छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा देण्यासाठी हजारोंच्या संख्येने शिवप्रेमी, सायकलपटू व नागरिक आवर्जून हजर होते. ‘शिव-शंभू यशोगाथा’ हा कार्यक्रम उपक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरला.
‘एआय काउंटिंग सिस्टम’ने दर्शवला विक्रमी सहभाग
सायक्लोथॉनमध्ये 38 हजार सायकलपटूंनी प्रत्यक्ष ऑनलाईन नोंदणी केली होती. WTE फाउंडेशनद्वारे वापरलेल्या अत्याधुनिक एआय काउंटिंग सिस्टममुळे प्रत्यक्ष उपस्थितीचे आकडे अधिक प्रभावी ठरले. संगणक दृष्टी आणि ‘डीप लर्निंग’ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्राप्त अहवालानुसार, 51 हजार 300 पेक्षा अधिक सायकली आणि 78 हजार 900 च्या जवळपास नागरिक या उपक्रमाला उपस्थित होते. नोंदणी व्यतिरिक्त बहुसंख्य सायकलपटू सहभागी झाले, ही बाब विशेष उल्लेखनीय आहे. सायक्लोथॉनच्या आयोजनामध्ये पिंपरी-चिंचवड महापालिका प्रभारी आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी सर्वोतोपरी पुढाकार घेतला. पिंपरी-चिंचवड पोलीस यासह विविध शासकीय विभाग आणि शाळा-महाविद्यालयांनी हा उपक्रम यशस्वी केला, त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो, अशी भावना मुख्य समन्वयक डॉ. निलेश लोंढे यांनी दिली.

तीन ट्रॅक, हजारोंचा सहभाग…
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, अविरत श्रमदान संस्था, सायकल मित्र, WTE फाउंडेशन आणि महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सायक्लोथॉनमध्ये 5, 15 आणि 25 किमी अशा तीन ट्रॅकवर हजारोंनी सहभाग नोंदवला. अविरत श्रमदानचे डॉ. निलेश लोंढे म्हणाले, “शिव-शंभू यशोगाथा ही केवळ सादरीकरणांची मालिका नसून आपला इतिहास आणि संस्कृती जपण्याची प्रेरणा आहे. हीच प्रेरणा निसर्गसंवर्धनाच्या कार्यात अधिक लोकांना जोडेल.”
“इंद्रायणी ही आपल्या संस्कृतीची जीवनधारा आहे. तिच्या स्वच्छतेसाठी मतभेद विसरुन सर्वांनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला मान्यता दिली. हे या उपक्रमाचे यश आहे. 79 हजारांहून अधिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहून नदी संवर्धनाचा लढा अधिक बळकट होईल. तमाम पिंपरी-चिंचवडकर, सोसायटी फेडरेशन आणि विविध स्वंयसेवी-संघटनांच्या सहभागामुळे ही विश्वविक्रमी सायक्लोथॉन यशस्वी होत आहे. यावर्षीची सायक्लोथॉन ‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’ला समर्पित केली आहे. हजारो सायकलपटूंनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जगातील सर्वात उंच स्मारकाला मानवंदना दिली. स्मारकाच्या उभारणीसाठी आम्हाला संघर्ष करावा लागला, अनेक आरोप झाले. आगामी काळात कोणताही आरोप सहन केला जाणार नाही. शहरासाठी शिव-शंभूंच्या कार्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन करतो.
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.
पिंपरी-चिंचवडमधून पवना, इंद्रायणी आणि मुठा अशा तीन नद्या वाहतात. त्यांचे संवर्धन, जनत आणि सौंदर्यीकरण ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. सायक्लोथॉन हा संयुक्त उपक्रम आहे. याद्वारे नागरिकांनी सायकलचा वापर अधिकाधिक करावा. ‘नॉन मोटराईझ व्हेईकल’हा नागरिकांच्या जीवनशैलीचा भाग असावा. सार्वजनिक वाहतूक सुविधांचा वापर करावा. ज्यामुळे प्रदूषण कमी होईल आणि शहरासाठी आरोग्यदायी वातावरण निर्माण होईल. पिंपरी-चिंचवड महापालिका अशा उपक्रमांना प्रोत्साहन देत आहे. नदी आणि शहर प्रदूषणमुक्त राहण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. हा देण्यासाठी हा रिव्हर सायक्लोथॉन आयोजित केली जाते. त्याला पिंपरी-चिंचवडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
– श्रावण हर्डिकर, प्रभारी आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका.






