राज ठाकरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला,राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Raj Thackeray : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात आता विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. ही सदिच्छा भेट आहे की आणखी काही? या चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. डिसेंबर २०२५ मध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी महापालिका निवडणुकांसाठी युतीची घोषणा केली होती. दरम्यान या युतीला मुंबईत यश मिळू शकलं नाही. जानेवारी महिन्यात जे निकाल समोर आले त्यात मनसे हा सर्वात कमकुवत कामगिरी करणारा पक्ष राज्यभरात ठरला. या सगळ्या घडामोडी घडत होत होत्या आता अचानक राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंचं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. याचे फोटोही व्हायरल झाले आहेत.
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या वेळी मनसेने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला. ज्यावरुन उद्धव ठाकरेंनी नाराजीही व्यक्त केली होती. तसंच राज ठाकरेंनी याबाबत बोलणं टाळलं होतं. या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी राज ठाकरे अचानक कसे काय पोहचले? याची चर्चा आता चांगलीच रंगली आहे. तूर्तास तरी ही सदिच्छा भेट असल्याचं आणि काही मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं कळतं आहे. मात्र राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. राज ठाकरेंनी ठाण्यात जात एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या दोघांमध्ये काय चर्चा झाली? ही माहिती अद्याप समोर आलेली नाही.
राज ठाकरे एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेले आहेत. यात काही मोठं आहे असं वाटत नाही. एकनाथ शिंदे माझ्या विरोधी पक्षात असले तरीही ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. तसंच राज ठाकरे हे मनसेचे पक्ष प्रमुख आहेत. त्यांनी कुणाला भेटायला जावं किंवा कुणाला भेटायला जाऊ नये हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री कुठल्याही पक्षाच्या प्रमुखाला भेटू शकतात तरीही त्यात वेगळं काही वाटण्याचं कारण नाही असं सुषमा अंधारेंनी सांगितलं आहे. निवडणुकांचा काळ असतो त्यावेळी ज्या भेटीगाठी होतात त्याचे अर्थ वेगळे असतात. अशा ज्या औपचारिक भेटी होतात तेव्हा त्यातून फार काही मोठं असतं असं नाही असंही सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. एका पक्षाचे प्रमुख एका राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना भेटले यात आक्षेप घेण्यासाऱखं काहीही नाही. राज ठाकरे एकनाथ शिंदेंना का भेटले हे त्या दोन पक्षांचे नेतेच सांगू शकतील असंही सुषमा अंधारेंनी म्हटलं आहे.




