रोहित पवारांच्या आरोपानंतर विमानाच्या ब्लॅक बॉक्सबाबत प्रफुल पटेलांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले, “काही षडयंत्र असेल तर…”

रोहित पवारांच्या आरोपानंतर विमानाच्या ब्लॅक बॉक्सबाबत प्रफुल पटेलांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले, “काही षडयंत्र असेल तर…”

Praful Patel : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाला २० दिवस होत आहेत. तरीही अद्याप हा अपघात की घातपात हा प्रश्न अनुत्तरीत असून त्याबद्दल वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत. आमदार रोहित पवार यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत प्रश्न उपस्थित केले. तसेच व्हीएसआर कंपनीच्या अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स खराब झाल्याच्या दाव्यावरही त्यांनी टीका केली.

यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते आणि कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी ब्लॅक बॉक्स संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. एएनआय वृत्तसंस्थेशी त्यांनी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “अजित पवारांच्या दुःखद निधनानंतर तपास कोणत्या पद्धतीने सुरू आहे. याची माहिती आम्हाला मिळायला हवी. तपासाची दिशा योग्य दिशेने आहे की नाही, प्रत्येक पैलूचा विचार केला जात आहे की नाही, याची माहिती मिळायला हवी.”

प्रफुल पटेल पुढे म्हणाले, “विमान अपघात तपास ब्युरोकडून विमान अपघाताच्या तांत्रिक बाबींची चौकशी करत आहे. मी असे ऐकले आहे की, ब्लॅक बॉक्समधून माहिती काढण्यासाठी तो अमेरिकेला पाठविला जाणार आहे. भारतात ब्लॅक बॉक्समधून डेटा रिकव्हर करण्यात अडचणी येत आहेत.”

हेही वाचा –  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकामध्ये आता सनदी अधिकाऱ्याची “एन्ट्री”

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नेत्या आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विमान अपघाताची चौकशी सीबीआयमार्फत केली जावी, या मागणीचे पत्र दिले. राष्ट्रवादीची ही मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मांडणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

याबाबत माहिती देताना प्रफुल पटेल म्हणाले, महाराष्ट्र सरकारने विमान अपघाताचा तपास सीआयडीकडे दिला होता. पण एवढ्या मोठ्या नेत्याच्या अपघातानंतर याचा सर्व बाजूंनी तपास व्हायला हवा. जर कुणी षडयंत्राचा आरोप करत असेल किंवा निष्काळजीपणा झाला असेल तर त्याही पैलूंचा तपास झाला पाहिजे. यात कोणतेही दुमत नाही.

“सीबीआय ही विश्वासपात्र संस्था आहे. अपघातामागे गुन्हेगारी पैलू असतील तर तेही सीबीआयच्या तपासात समोर येण्याची शक्यता आहे”, असे प्रत्युत्तर प्रफुल पटेल यांनी दिले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *