breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मराठी जनांनी ‘ही’ शपथ घ्यावी; शिवराज्याभिषेक दिनी राज ठाकरेंचं आव्हान

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवराज्याभिषेक दिनाचा उत्साह महाराष्ट्रभर पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्वीटरच्या माध्यमातून सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

राज ठाकरे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, सर्वप्रथम महाराष्ट्रातील तमाम जनतेला ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या मनापासून शुभेच्छा. ३५० वर्षांपूर्वी महाराजांचा जो राज्याभिषेक सोहळा झाला तो काही साधासुधा राज्याभिषेक नव्हता. मध्ययुगातील इस्लाम आक्रमकांच्या काळात स्वतःच सार्वभौम राज्य असावं असं स्वप्न सुद्धा ह्या देशात जेंव्हा पडत नव्हतं तेंव्हा एका राजाने स्वराज्याची निर्मिती करून एका नव्या युगाची सुरुवात झाल्याची नांदीच दिली होती. त्यानंतर पार अटकेपार गेलेल्या मऱ्हाठा साम्रज्याची प्रेरणा असो की देशाच्या स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा हे महाराजांनी स्थापन केलेलं हिंदवी स्वराज्यच होती ह्यात शंका नाही. पुढे स्वातंत्र्योत्तर काळात पण खरंतर हीच प्रेरणा असायला हवी होती, ती किती आहे हे आपण बघतच आहोत. असो.

हेही वाचा – विद्यार्थ्यांनी घेतले कौशल्य अन् उद्योजकतेचे धडे!

मी आणि माझे सहकारी उद्या सूर्योदयाच्या आसपास महाराजांना रायगडावर जाऊन महाराजांना अभिवादन करणार आहोतच, पण माझी एक तीव्र इच्छा आहे. ती म्हणजे हा सोहळा आणि त्याचा इतिहास, त्याचं महत्व आपण मराठी जनांनी जगाला ओरडून सांगायला हवं. आणि तेवढ्यावर न थांबता जातीपातीच्या पलीकडे जाऊन महाराजांच्या काळातील महाराष्ट्राचं गतवैभव परत आणण्यासाठी एकत्र यायला हवं, झटायला हवं. अन्यथा हा सोहळा फक्त एक उपचार होईल, उत्सव होईल !

बाबासाहेब पुरंदरेंचं एक खूप छान वाक्य आहे, परदेशात त्यांच्या महापुरुषांचे पुतळे उठसुठ बघायला मिळत नाहीत कारण ते महापुरुष, त्यांचे विचार, त्यांच्या रक्तात सामील झालेले असतात. आपल्याकडे महापुरुष, त्यांचे विचार आपल्या धमण्यामंध्ये सळसळत नाहीत म्हणून आपल्याला जागोजागी पुतळ्यांची गरज लागते. हे चित्र बदलण्यासाठी, प्रत्येकाच्या मनात, रक्तात शिवाजी महाराज आणि त्यांचे विचार सामील झाले तरच महाराष्ट्राचं गतवैभव पुन्हा एकदा प्राप्त होईल. ह्यासाठी मराठी जनांनी निर्धार करायला हवा, शपथ घ्यायला हवी आणि त्यासाठी राज्याभिषेक सोहळ्यापेक्षा उत्तम क्षण अजून कुठला असणार? असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button