देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार? भाजपा नेत्याचा दुजोरा

मुंबई | विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं आहे. एकट्या भाजपाने १३२ जागा जिंकल्या आहेत. २३९ पैकी १३२ जागा भाजपाच्या नावावर आहेत त्यामुळे भाजपा हा महायुतीतला आणि महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांच्या नावावर शिक्कामार्फ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, भाजपा नेते व फडणवीसांचे सहकारी आमदार प्रवीण दरेकर यांनी या वृत्तांना सूचक शब्दांत दुजोरा दिला आहे.
प्रवीण दरेकर म्हणाले, की राज्यातील जनतेने देवेंद्र फडणवीस यांना बहुमत दिल्यानंतर आमच्या सर्व भाजपा कार्यकर्त्यांची व नेत्यांची मागणी होतीच की आता आपण जवळपास १३२ जागा जिंकल्या आहेत, आपल्याबरोबर चार ते पाच अपक्ष आमदार देखील देखील आहेत. त्यामुळे आपल्याबरोबर १३७ आमदार झाले आहेत. अशा स्थितीत मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव पुढे येणं स्वाभाविक होतं. प्रसारमाध्यमं ज्या प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध करत आहेत त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित झालं असेल तर माझ्यासह भाजपा नेते कार्यकर्ते व महायुतीच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना देखील आनंद होईल. कारण, देवेंद्र फडणवीस यांनी तिन्ही पक्षांना एकत्र घेऊन समन्वय साधत ही निवडणूक जिंकली आहे. ते मुख्यमंत्री झाले तर राज्यातील जनतेला आनंदच होणार आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी पाच वर्षे राज्याचे नेतृत्व केलं आहे. त्यांची प्रशासकीय व दूरदृष्टी असलेली कारकीर्द राज्यातील जनतेने पाहिली आहे.
हेही वाचा – पृथ्वीराज चव्हाण यांचं विरोधी पक्षनेते पदावरून मोठं भाष्य; म्हणाले..
आमचा स्ट्राईक रेट सर्वाधिक आहे. आमच्या जागा देखील सर्वाधिक आहेत. त्यामुळे आम्ही महायुतीमधील पक्ष एकमेकांबरोबर स्पर्धा न करता तिन्ही पक्षांमध्ये समन्वय साधून मुख्यमंत्रीपदाबाबतचा निर्णय घेत आहोत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असतील तर आमच्यापैकी कोणी नाराज होणार नाही किंवा ते मुख्यमंत्री झाले म्हणून इतरांकडे दुर्लक्ष होणार नाही. देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीची मोट बांधली आहे. तिन्ही पक्षांना एकत्र ठेवणं, जागावाटपाचं नियोजन करणं, प्रसंगी आपल्या जागा घटकपक्षांना सोडणं, घटकपक्षांकडे एखाद्या जागेवर उमेदवार नसेल तर उमेदवारासह ती जागा त्यांना देणं, असे महत्त्वाचे निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये घेतले आहेत, असंही प्रवीण दरेकर म्हणाले.





