पिंपरी-चिंचवडला ‘लाल दिवा’? : राज्य मंत्रीमंडळ विस्ताराच्या हालचाली!
![Pimpri-Chinchwad 'red light'? : State Mantra Mandal Expansion Movements!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/Eknath-Shinde-Devendra-Fadavis-Maharashtra-780x470.jpg)
- पोटनिवडणुकीच्या धामधुमीत पिंपरी-चिंचवडकरांसाठी गोड बातमी
- शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच मंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता
पिंपरी । विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षामुळे रखडलेला शिंदे-फडणवीस सरकारचा उर्वरित मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दि. २७ फेब्रुवारीपासून राज्याचे अर्थसंकल्प अधिवेशन सुरू होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांच्याशी भेट घेणार आहेत. या भेटीत विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात द्यावयाच्या भाषणासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता असून मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चाही होणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली.
दरम्यान, मंत्रीमंडळ विस्तारात पिंपरी-चिंचवडला मंत्रीपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांना संधी देण्याबाबत महायुतीमध्ये खलबंत सुरू आहेत. लांडगे यांच्या रुपाने शहराला पहिल्यांदा मंत्रीपद मिळेल, असा दावा केला जात आहे.
विशेष म्हणजे, चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची धामधूम सुरू असताना शहराला गोड बातमी मिळण्याची शक्यता असल्याने भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
निवडणुक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव दिल्याने राज्यातील सत्तासंघर्षाचा पेच सुटल्यात जमा आहे. मात्र १६ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार असूनही सर्वोच्च न्यायालयातील निकाल शिंदेंच्या बाजूने झुकला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या समोरील अडचणी काहीशा आता दुर झाल्या असून शिंदेंना मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे येत्या २६ फेब्रुवारी रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार असल्याचा विचार सुरू आहे.
गेल्या सात ते आठ महिन्यापासून एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे. सध्या एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री धरून २० मंत्री कारभार पाहत आहेत. यातच आता दुसऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिंदे गटाला किती खाती मिळणार त्याकडे लक्ष लागून राहिलं आहे. शिंदे गटाकडे ९ तर भाजपकडेही ९ खाती सध्या कार्यरत आहेत. त्यामुळे पुढच्या विस्तारात अपक्ष आमदार, आणि महिलांचाही समावेश केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.