ओबीसी समाजाकडून या मराठा आरक्षणाला विरोध
OBC समाजही उपोषण करणार, 15 दिवसांत मुंबई गाठणार
मुंबई : मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज आंदोलनासाठी मुंबईच्या दिशेने कूच करत आहे. उद्या 27 ऑगस्टला जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात उपोषण करणार आहेत. मात्र आता ओबीसी समाजाकडून या मराठा आरक्षणाला विरोध करण्यात येत आहे. याबाबत आज नागपुरमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी काळातील ओबीसी आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
ओबीसी महासंघाची बैठक
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीला राज्यभरातील महत्वाचे पदाधिकारी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने उपस्थित होते. यावेळी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याच्या मागणीला तीव्र विरोध करण्यात आला. तसेच ओबीसी आंदोलनाची दिशाही ठरविण्यात आली.
15 दिवसात मुंबईकडे कूच करणार
यावेळी बोलताना ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे म्हणाले की, उद्यापासून राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जनजागृती मोहिम राबवली जाईल आणि पत्रकार परिषद घेऊन ओबीसी समाजाची भूमिका मांडली जाणार आहे. त्यानंतर 30 ऑगस्ट 2025 रोजी नागपूरातील संविधान चौकात साखळी उपोषण केले जाईल. इतर जिल्ह्यांमध्ये स्थानिक पदाधिकारी उपोषण करून सरकारचे लक्ष वेधणार आहेत. आम्ही 15 दिवसांत मुंबईकडे कूच करण्याची तयारी करत आहोत. यातून आम्ही सरकारचे लक्ष आमच्या मागण्यांकडे वेधू असं तायवाडे म्हणाले.
हेही वाचा : पीओपी व शाडू मातीच्या मूर्तींची नोंद ठेवा
ओबीसी समाजाचे आरक्षण कमी करु नये
‘आम्हाला सरकारने हमी दिली आहे, त्यावर सरकारने ठाम रहावे. ओबीसी समाजाला जे आरक्षण दिले जात आहे त्याला धक्का लागू नये. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊन ओबीसी समाजाचे आरक्षण कमी करु नये. तसेच मराठा समाजाला ज्यांच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत, त्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्रे देऊ नयेत’ अशी मागणीही डॉ. बबनराव तायवाडे यांनी केली.
मनोज जरांगे पाटलांची मागणी बेकायदेशीर – लक्ष्मण हाके
मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीवर बोलताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणाले की, मनोज जरांगे पाटलांची मागणी बेकायदेशीर आहे. सरकारने त्यांना फॅक्ट समजून सांगितला पाहिजे, नाहीतर महाराष्ट्रात अराजकता निर्माण होऊ शकते. मराठा तेवढाच मेळवावा ओबीसी मुळासकट संपवावा असाच जरागेच्या मागणीचा अर्थ होतो. ओबीसी जरांगेंच्या आंदोलनाला प्रति आंदोलन पुकारतील त्यांची संख्या जेवढी आहे त्याच्या दहापट संख्या महाराष्ट्राच्या रस्त्यावर उतरलेली दिसेल असंही हाके यांनी म्हटलं आहे.




