राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार- शहराध्यक्ष संजोग वाघेरे- पाटील यांची दिल्लीत खलबते!
![NCP's Sarvesarva Sharad Pawar- City President Sanjog Waghere- Patil is upset in Delhi!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/2ac72ac4-ddba-4d59-8926-1e79b4f1d315.jpg)
- पिंपरी-चिंचवडमध्ये एकहाती सत्तेसाठी राजकीय व्यूहरचना कशी असेल?
पिंपरी | विशेष प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचा एकेकाळी बालेकिल्ला असणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरामध्ये एकहाती सत्तेसाठी राजकीय व्यूहरचना कशी असू शकते? याबाबत गुरुवारी राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकार्यांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची दिल्लीमध्ये भेट घेऊन चर्चा केली.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्ली येथे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, विरोधी पक्षनेते राजूमिसाळ, माजी विरोधी पक्षनेते व विद्यमान नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी सदिच्छ भेट घेतली.
आजच्या बैठकीमध्ये मागील पंचवार्षिक निवडणुकीचा अनुभव लक्षात घेऊन भविष्यात पालिका निवडणुकीला सामोरे जाताना कशा प्रकारची तयारी करायची, याचे मार्गदर्शन घेण्यासाठी दिल्ली येथे ज्येष्ठ नेते पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत पायउतार झाल्यानंतर पुन्हा सत्तेत यावी, यासाठी पक्ष संघटन कसे असावे, या अनुषंगाने बैठकीत चर्चा झाली.आज बैठकीत सत्तारूढ भारतीय जनता पक्षाचा भ्रष्टाचार, एकहाती सत्तेसाठी राजकीय व्यूहरचना,सत्ता जाण्यास कारणीभूत ठरलेल्या बाबी, कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ हे प्रमुख मुद्दे चर्चा करण्यात आले, असे सांगण्यात आले आहे.
खासदार अमोल कोल्हे यांचे अभिनंदन….
पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने यावेळी बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी संसदेत पाठपुरावा करणारे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे अभिनंदन केले.
पिंपरी- चिंचवडमध्ये पुन्हा राष्ट्रवादी : संजोग वाघेरे- पाटील
साहेबांनी लक्ष घातल्यावर राष्ट्रवादीचीच सत्ता पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचार आणि आगामी महापालिका निवडणुकीची व्यूहरचना ठरविण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचे प्रणेते शरद पवार यांची भेट घेतली. खुद्द साहेबांनी लक्ष घातल्यावर पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा एकहाती सत्ता मिळविणे अवघड नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यावेळी म्हणाले.