breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

बोपखेलवर २० वर्षे अन्याय करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची ‘चमकोगिरी’

  •  भाजपाचे माजी नगरसेवक विकास डोळस यांची टीका

  •  भाजपाच्या विकासकामांवर श्रेय लाटण्याचा प्रकार

पिंपरी । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट झाल्यापासून २० वर्षे बोपखेलला विकासकामांपासून वंचित ठेवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांनी आता निवडणुकीच्या तोंडावर चमकोगिरी सुरू केली आहे. वास्तविक, भाजपाने केलेल्या विकासकामांची पाहणी करुन राजकीय श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न राष्ट्रवादीकडून केला जात आहे, अशी टीका भाजपाचे माजी नगरसेवक विकास डोळस यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचा पिंपरी-चिंचवड दौरा आयोजित केला आहे. या दौऱ्यामध्ये शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांची पाहणी करण्यात येत आहे. यासंदर्भात भाजपाचे माजी नगरसेवक विकास डोळस यांनी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांवर टीका केली आहे.
विकास डोळस म्हणाले की, शहरातील विकासकामांची पाहणी उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार करीत आहेत. मात्र, राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांकडून भाजपानेच मंजुर केलेली आणि सुरू केलेली कामे पाहणीचा दौरा आखला जातो. महापालिकेत प्रशासक राजवट लागू झाली असल्यामुळे त्याआडून राष्ट्रवादी आगामी निवडणुकीसाठीचा छुपा अजेंडा राबवण्याचा प्रयत्न करीत आहे.

वास्तविक, चिखली जलशुद्धीकरण प्रकल्प आणि आंद्रा भामा आसखेडच्या पाण्यावरुन राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी भाजपावर आरोप केले. त्याच कामाची अजित पवार यांच्याकडून पाहणी करुन घेतली. हा प्रकल्प आम्हीच मार्गी लावला, असी बतावणी जाहीरपणे केली. आता बोपखेलमध्ये वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला उड्डाणपूलाच्या कामासाठी भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला होता. त्यामुळे उड्डाणपुलाचे काम मार्गी लागले. मात्र, आता राष्ट्रवादी या पुलाच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी पुढे येत आहे.

  • २० वर्षांत झाले नाही, ते ५ वर्षांत झाले…

महापालिकेत समाविष्ट झाल्यापासून बोपखेलवर राष्ट्रवादीकडून अन्याय झाला. एकाही महत्त्वाचा प्रकल्प बोपखेलमध्ये झाला नाही. भाजपाच्या पाच वर्षांच्या काळात उड्डाणपुल, संरक्षण विभागाच्या हद्दीतील रस्ते, बहुउद्देशीय इमारत, कर संकलन कार्यालय, जलवाहिनी, पाणी प्रश्न, उद्यान विकसित करण्यासाठी भाजपाने पुढाकार घेतला. गेल्या २० वर्षांत जी कामे राष्ट्रवादीने केली नाही, तेव्हढी पाच वर्षांत भाजपाने केली. मात्र, आता निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी प्रशासकाच्या आडून श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहे, असेही विकास डोळस यांनी म्हटले आहे.

  • एसटीपी प्रकल्प बंद पाडल्याची राष्ट्रवादीला विस्मूर्ती…

बोपखेलमधील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी भाजपाने मंजूर केलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विरोध केला. या प्रकल्पासाठी भाजपा सत्ताकाळात निविदा काढण्यात आली. त्यावर आक्षेप घेण्यात आला. प्रशासनाने पुन्हा निविदा काढली. तरीही राष्ट्रवादीने या प्रकल्पाला खोडा घातला. बोपखेलकरांच्या नागरी आरोग्याच्या दृष्टीने आणि नदी संवर्धनासाठी आवश्यक असलेला हा प्रकल्प गुंडाळण्यासाठी राष्ट्रवादीने प्रशासनावर दबाव निर्माण केला. राष्ट्रवादीच्या माजी पदाधिकाऱ्याने हा प्रकल्प बंद करण्याच्या सूचना अजित पवार यांनी दिल्या त्यामुळे प्रशासनाने कारवाई केली, असे जाहीरपणे प्रसारमाध्यमांना सांगितले. आता हेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी बोपखेलमध्ये विकासकामांची पाहणी करण्याचे ढोंग करीत आहेत. राष्ट्रवादी आणि त्यांच्या नेत्यांना हा दुटप्पीपणा शोभतो का? असा सवालही विकास डोळस यांनी उपस्थित केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button