breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘ब्लू टीक’वरून नवाब मलिकांनी मोदी सरकारला लगावला टोला; म्हणाले…

मुंबई |

गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकार आणि लोकप्रिय मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटर यांच्यात संघर्ष होताना दिसत आहे. नव्या माहिती-तंत्रज्ञान नियमांवरून केंद्र सरकारने ट्विटरला इशारा दिला. हा सुप्त संघर्ष सुरू असतानाच ट्विटरने नियमांवर बोट ठेवत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्यासह सरसंघचालक मोहन भागवत आणि इतर संघ नेत्यांच्या ट्विटर हॅण्डलवरील ब्लू टीक काढून टाकली आणि पुन्हा सुरू केली. पण यानंतर केंद्राने ट्विटरला नोटीस पाठवत नियमांची अंमलबजावणी करण्याचा शेवटचा इशारा दिला. याच वादावरून राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मोदी सरकारला टोला लगावला आहे.

“ब्लू टीक’आणि लसीकरण यातील फरक पहिल्यांदा केंद्र सरकारने समजून घ्यावा. ‘ब्लू टीक’ पेक्षा सरकारने लोकांच्या लसीकरणाकडे जास्त लक्ष द्यावं. ट्वीटरवर संपूर्ण भाजपा आणि केंद्र सरकार ‘ब्लू टीक’ची लढाई लढताना दिसत आहे, तर दुसरीकडे देशातील जनता लसीकरणाची लढाई लढत आहे,” अशी टीका मलिक यांनी मोदी सरकारवर केली. “ट्वीटरवरील ‘ब्लू टीक’ असेल किंवा करोना काळातील लोकांचे लसीकरण असेल यावरून केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करून केंद्र सरकार आपल्याच अहंकारात मश्गुल आहे,” असा संताप मलिक यांनी व्यक्त केला.

  • …त्यामुळेच महाराष्ट्रात रुग्णसंख्येत घट

“महाराष्ट्रात आणि देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत असून सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमाचे पालन केल्याने हे घडलं आहे. राज्यात सध्या दहा जिल्ह्यांना पहिल्या टप्प्यात जास्त सूट देण्यात आली आहे. काही जिल्ह्यात निर्बंध आहेत, तर काही जिल्ह्यात जास्तच निर्बंध लागू आहेत. लोकांनी सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमाचे पालन केले तर लवकरात लवकर आपण कोरोनातून मुक्त होवू,” असंही मलिक म्हणाले. “जे दहा जिल्हे पहिल्या टप्प्यात आहेत. त्यातील लोकांनी नियमांचे पालन केले नाही, तर ते दुसर्‍या किंवा तिसऱ्या टप्प्यात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून नियमांचे काटेकोर पालन करायला हवं,” असे आवाहनही नवाब मलिक यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button