breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रराजकारण

‘सिंधुदुर्ग किल्ला भारतातील प्रत्येक नागरिकाच्या मनात अभिमानाची भावना निर्माण करतो’; प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

सिंधुदुर्ग : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सिंधुदुर्ग येथे आयोजित ‘नौदल दिन २०२३’ च्या मुख्य कार्यक्रमाला उपस्थित होते. सिंधुदुर्ग येथील तारकर्ली समुद्रकिनारी भारतीय नौदलाची जहाजे, पाणबुड्या, विमाने आणि विशेष दलांची ‘थरारक प्रात्यक्षिके’ यांचे त्यांनी निरीक्षण केले.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना प्रधानमंत्री म्हणाले की, मालवण, तारकर्ली किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग हा भव्य किल्ला, वीर शिवाजी महाराजांचे वैभव आणि राजकोट किल्ल्यावरील त्यांच्या नेत्रदीपक पुतळ्याचे लोकार्पण आणि भारतीय नौदलाचा जयघोष आणि ४ डिसेंबर या ऐतिहासिक दिवसामुळे भारतातील प्रत्येक नागरिकाचे मन उत्कटता आणि उत्साहाने भारावून गेले आहे.मोदी यांनी नौदल दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि देशासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या शूरवीरांपुढे नतमस्तक झाले.

सिंधुदुर्गच्या विजयी भूमीवर नौदल दिन साजरा करणे हा खरोखरच अभूतपूर्व अभिमानाचा क्षण आहे असे प्रधानमंत्री म्हणाले. “सिंधुदुर्ग किल्ला भारतातील प्रत्येक नागरिकाच्या मनात अभिमानाची भावना निर्माण करतो”. यावेळी त्यांनी शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचा उल्लेख करत सांगितले की कोणत्याही देशासाठी नौदल क्षमतेचे महत्त्व ते जाणून होते. ज्यांचे समुद्रावर नियंत्रण आहे त्यांच्याकडे अंतिम सत्ता आहे या शिवाजी महाराजांच्या घोषणेचा पुनरुच्चार करत प्रधानमंत्री म्हणाले की, त्यांनी शक्तिशाली नौदलाची उभारणी केली. कान्होजी आंग्रे, मायाजी नाईक भाटकर, हिरोजी इंदुलकर या योद्ध्यांपुढे नतमस्तक होत ते आजही प्रेरणास्थान असल्याचे त्यांनी नमूद केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाने प्रेरित होऊन आजचा भारत गुलामगिरीची मानसिकता झुगारून पुढे मार्गक्रमण करत आहे असे प्रधानमंत्री म्हणाले. नौदल अधिकार्‍यांच्या गणवेशावरील मानचिन्ह (इपॉलेट्स) आता छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आणि ठेवा अधोरेखित करतील कारण हे नवीन मानचिन्ह नौदलाच्या प्रतीक चिन्हाशी साधर्म्य साधते याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. त्यांनी गेल्या वर्षी नौदलाच्या ध्वजाचे अनावरण केल्याची आठवण सांगितली. आपल्या वारशाचा अभिमान बाळगत प्रधानमंत्री यांनी घोषणा केली की भारतीय नौदल आता भारतीय परंपरेनुसार आपल्या पदांचे (रँक) नामकरण करणार आहे. सशस्त्र दलांमध्ये नारी शक्ती मजबूत करण्यावरही त्यांनी भर दिला. नौदलाच्या जहाजात भारताच्या पहिल्या महिला कमांडिंग ऑफिसरच्या नियुक्तीबद्दल मोदी यांनी भारतीय नौदलाचे अभिनंदन केले.

१४० कोटी भारतीयांचा विश्वास ही सर्वात मोठी शक्ती आहे कारण भारत मोठी उद्दिष्टे निश्चित करत आहे आणि पूर्ण दृढनिश्चयाने ती साध्य करण्यासाठी झटत आहे असे प्रधानमंत्री म्हणाले. विविध राज्यांतील लोक ‘ राष्ट्र प्रथम’ या भावनेने प्रेरित होत असल्यामुळे संकल्प, भावना आणि आकांक्षा यांच्या एकत्रित सकारात्मक परिणामांची झलक दिसून येत आहे असे प्रधानमंत्री म्हणाले. “आज देशाने इतिहासातून प्रेरणा घेतली आहे आणि उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शक आराखडा तयार केला जात आहे. नकारात्मकतेच्या राजकारणावर मात करून प्रत्येक क्षेत्रात पुढे जाण्याचा संकल्प जनतेने केला आहे. हा संकल्प आपल्याला विकसित भारताकडे घेऊन जाईल” असे ते म्हणाले.

हेही वाचा  –  कामगार विश्व: ग्रुपो ॲन्टोलीन कंपनीतील कामगारांना ‘विंटर गिफ्ट’

भारताच्या व्यापक इतिहासाबाबत व्यक्त होताना प्रधानमंत्री म्हणाले की, हा इतिहास केवळ गुलामगिरी, पराभव आणि निराशेबद्दलचा नसून, त्यामध्ये भारताचे विजय, धैर्य, ज्ञान आणि विज्ञान, कला आणि सृजनशीलता, कौशल्ये आणि भारताच्या सागरी क्षमतांच्या गौरवशाली अध्यायांचाही समावेश आहे. तंत्रज्ञान आणि साधन सामुग्रीची उपलब्धता जवळजवळ नाहीच, अशा काळात उभारण्यात आलेल्या सिंधुदुर्गसारख्या किल्ल्याचे उदाहरण देऊन त्यांनी भारताच्या या क्षमतांवर प्रकाश टाकला. त्यांनी गुजरातमधील लोथल येथे सापडलेले सिंधू संस्कृतीमधील बंदर, आणि सुरत येथील ८० पेक्षा जास्त जहाजे नांगरण्याची क्षमता असलेल्या बंदराच्या वारशाचा उल्लेख केला. चोल साम्राज्याने आग्नेय आशियाई देशांपर्यंत आपला व्यापार वाढवला होता, त्याचे श्रेय पंतप्रधानांनी भारताच्या सागरी सामर्थ्याला दिले. परकीय शक्तींच्या आक्रमणामुळे सर्वात प्रथम भारताची सागरी क्षमता बाधित झाल्याचे सांगून प्रधानमंत्री म्हणाले की, जो भारत नौका आणि जहाजे बनवण्यासाठी प्रसिद्ध होता, त्याने समुद्रावरील आपले नियंत्रण गमावले आणि त्यामुळे सामरिक-आर्थिक ताकदही गमावली. भारत विकासाकडे वाटचाल करत असताना, आपण आपले गमावलेले वैभव परत मिळवायला हवे, यावर भर देत पंतप्रधानांनी ब्लू इकॉनॉमी, अर्थात नील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकार अथक प्रयत्न करत असल्याचे अधोरेखित केले. त्यांनी ‘सागरमाला‘ प्रकल्पाअंतर्गत बंदराच्या माध्यमातून होत असलेल्या विकासाचा उल्लेख केला आणि सांगितले की भारत ‘मेरिटाइम व्हिजन‘, अर्थात सागरी दृष्टीकोना अंतर्गत आपल्या महासागरांच्या पूर्ण क्षमतेचा उपयोग करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यांनी माहिती दिली की सरकारने व्यापारी मालवाहतुकीला चालना देण्यासाठी नवीन नियम बनवले आहेत, त्यामुळे गेल्या ९ वर्षांमध्ये भारतातील सागरी व्यापाऱ्यांची संख्या १४० टक्क्यांहून अधिक वाढली आहे. सध्याच्या काळाचे महत्त्व अधोरेखित करताना प्रधानमंत्री म्हणाले, “हा भारताच्या इतिहासाचा असा काळ आहे, जो केवळ ५-१० वर्षांचा नव्हे, तर येणाऱ्या अनेक शतकांचे भविष्य लिहिणार आहे.” ते म्हणाले की गेल्या दहा वर्षांमध्ये भारताने जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये दहाव्या स्थानावरून झेप घेत, तो पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरला आहे, आणि तिसऱ्या स्थानाच्या दिशेने वेगाने प्रवास करत आहे. “जग भारताचा ‘विश्व मित्र (जगाचा मित्र)’ म्हणून उदय होताना पाहत आहे,” असे सांगून प्रधानमंत्री म्हणाले की, इंडिया मिडल ईस्ट युरोपियन कॉरिडॉर सारख्या उपायांमुळे हरवलेला मसाल्याचा मार्ग पुन्हा निर्माण होईल. त्यांनी मेड इन इंडियाचे सामर्थ्य स्पष्ट करताना, तेजस, किसान ड्रोन, यूपीआय प्रणाली आणि चांद्रयान-3 यांचा उल्लेख केला.

देशाच्या किनारपट्टी आणि सीमावर्ती भागातील गावांना, देशातील शेवटचे गाव, असे संबोधण्या ऐवजी, ‘देशातील पहिले गाव’ समजण्याच्या सरकारच्या दृष्टिकोनाचा पुनरुच्चार करताना मोदी म्हणाले, “आज, किनारपट्टी भागातील प्रत्येक कुटुंबाचे जीवनमान सुधारणे ही केंद्र सरकारची प्राथमिकता आहे.” २०१९ मध्ये स्वतंत्र मत्स्यव्यवसाय मंत्रालयाची निर्मिती आणि या क्षेत्रात ४० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा उल्लेख करून, २०१४ नंतर मत्स्य उत्पादनात ८ टक्के आणि निर्यातीत ११० टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती त्यांनी दिली. त्याशिवाय, शेतकऱ्यांसाठी विमा संरक्षण २ लाखावरून वरून ५ लाखांपर्यंत वाढवण्यात आले असून त्यांना किसान क्रेडिट कार्डचा लाभ मिळत आहे. मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील मूल्य साखळीच्या विकासाबाबत बोलताना प्रधानमंत्री म्हणाले की सागरमाला योजना किनारपट्टी भागातील आधुनिक कनेक्टिव्हिटी (संपर्क यंत्रणा) मजबूत करत आहे. यावर लाखो कोटी रुपये खर्च होत असून त्यामुळे किनारपट्टी भागात नवे व्यापार आणि उद्योग सुरु होतील. मत्स्य प्रक्रियेशी संबंधित उद्योग आणि मासेमारी नौकांचे आधुनिकीकरणही हाती घेतले जात असल्याचे प्रधानमंत्री यांनी सांगितले.

“कोकण हा अभूतपूर्व संधींचा प्रदेश आहे”, असे प्रधानमंत्री म्हणाले. या राज्याच्या विकासासाठी सरकारची बांधिलकी अधोरेखित करताना प्रधानमंत्री यांनी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, अलिबाग, परभणी आणि धाराशिव येथील वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन, चिपी विमानतळाचे कार्यान्वयन आणि माणगावपर्यंत जोडणाऱ्या दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरचा उल्लेख केला.काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष योजना तयार केल्याचेही प्रधानमंत्री यांनी नमूद केले. समुद्रकिनारी असलेल्या निवासी भागांचे रक्षण करणे हे सरकारचे प्राधान्य असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या प्रयत्नात त्यांनी खारफुटीची व्याप्ती वाढविण्यावर भर दिला जात असल्याचा उल्लेख केला. खारफुटी व्यवस्थापनासाठी मालवण, आचरा-रत्नागिरी आणि देवगड-विजयदुर्गसह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणांची निवड करण्यात आल्याची माहिती प्रधानमंत्री मोदींनी दिली.

“वारसा आणि विकास, हाच आपला विकसित भारताचा मार्ग आहे,” असे प्रधानमंत्री यांनी अधोरेखित केले. ते म्हणाले की, कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात या वास्तूंच्या संवर्धनावर कोट्यवधी रुपये खर्च होत असताना छत्रपती वीर शिवाजी महाराजांच्या काळात बांधलेले गड-किल्ले जतन करण्याचा केंद्र व राज्य सरकारचा निर्धार आहे. यामुळे या भागातील पर्यटन वाढून नवीन रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे प्रधानमंत्री यांनी नमूद केले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button