नामदेव शास्त्री यांची धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया; म्हणाले..

Namdev Shastri | बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सीआयडीने न्यायालयात नुकतंच दोषारोपपत्र दाखल केलं. या दोषारोप पत्रामधून अनेक खुलासे समोर आले. यातच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या संदर्भातील काही फोटो समोर आले आणि राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. यानंतर अखेर धनंजय मुंडेंनी यांनी काल (४ मार्च) राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याचं समर्थन करणाऱ्या अनेक प्रतिक्रिया समोर आलेल्या असताना आता भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
नामदेव शास्त्री म्हणाले, की धनंजय मुंडे यांच्याविषयीचं माझं वक्तव्य हे अजाणतेपणातून होतं. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा धनंजय देशमुख परिवार गडावर आले, तेव्हा त्यांनी जाण करून दिली. तेव्हा या क्रूरतेची जाणीव झाली. तेव्हा माझंही अंतःकरण दुखावलं. न्यायालयाला मी प्रार्थना करतो की आरोपींना लवकरात लवकर शिक्षा मिळावी. भगवान गड नेहमीच पीडित कुटुंबाच्या पाठीशी आहे.
हेही वाचा : ‘जयकुमार गोरेंसारखे विकृत मंत्री राज्यमंत्रिमंडळात’; संजय राऊतांचा हल्लाबोल
मी धनंजय मुंडे यांच्या मानसिकतेचा आढावा घेतला. सर्व समजून घेतल्यानंतर मला असं जाणवलं की जो मुलगा राजकीय घराण्यामध्ये जन्माला आलेला आहे. तसेच पक्षाचे सर्व नेते त्यांचे बालमित्र आहेत. मग असं असताना आणि त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्यांना गुन्हेगार का ठरवलं जातंय? कारण ते एवढ्या वर्षांपासून आमच्या जवळ आहेत. तसेच ते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आहेत. तरीही त्यांना गुन्हेगार का ठरवत आहेत? जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवण्यात येत आहे असंही मला वाटतंय. यात आमच्या साप्रदायाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. जातीयवाद नष्ट होत असताना काही राजकीय स्वार्थी लोकांनी जातीवाद पुन्हा उफाळून आणला आहे, असंही नामदेव शास्त्री म्हणाले.