शरद पवार यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा; खासदार निलेश लंके यांची मागणी

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार निलेश लंके यांनी केली आहे. या मागणीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी या मागणीची खिल्ली उडवली आहे.
खासदार निलेश लंके यांनी म्हटले की, शरद पवार असे एकमेव कृषी मंत्री आहेत, ज्यांच्या काळात ७२ हजार कोटींची विक्रमी अशी शेतकऱ्यांची कर्ज माफी झाली. तसेच देशाच्या अनेक महत्त्वाच्या प्रश्नांमध्ये शरद पवारांचा मोठा वाटा राहिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अशी भावना आहे की, शरद पवारांना भारतरत्न पुरस्काराने गौरविले गेले पाहिजे. सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनातही आम्ही याबद्दलची मागणी करू, असेही खासदार निलेश लंके म्हणाले.
हेही वाचा : कोथरूड विधानसभा उत्तर मंडल अध्यक्ष लहू बालवडकर यांचा गावभेट दौरा सुरू
शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रफुल पटेल हे दिल्लीमध्ये एकत्र आल्याचे दिसून आले. दोन्ही गटांच्या नेत्यांमध्ये बैठक झाल्याची चर्चा असून, यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आगामी काळात एकत्र येण्याच्या चर्चांना वेग आला आहे. याबाबत विचारले असता निलेश लंके म्हणाले की, पवार कुटुंब एकत्रच आहे. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणे ही कौटुंबिक बाब आहे.
दरम्यान, खासदार निलेश लंके यांनी केलेल्या मागणीबाबत भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांना विधीमंडळात प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना पडळकर म्हणाले की, आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. आता मी शांतपणे गावाला जातो. भारतरत्न हा कुठल्या मंडळाचा पुरस्कार आहे का? काहीही मागणी केली जाते.




