लोणावळा नगरपरिषद निवडणूक : राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष ‘दहा हजारांहून अधिक मतांनी’ विजयी होईल : आमदार सुनील शेळके
प्रचारफेरीत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; विकासकामांवर विश्वास ठेवा, विजय इतिहास घडवेल — राष्ट्रवादी काँग्रेस

लोणावळा | प्रतिनिधी
आगामी लोणावळा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेचा वाढता प्रतिसाद आणि संघटनेची भक्कम तयारी पाहता “राष्ट्रवादी काँग्रेसचा नगराध्यक्ष दहा हजारांपेक्षा जास्त मतांनी विजयी होईल,” असा ठाम विश्वास आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केला.
मावळ तालुक्यासह लोणावळ्यात राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, त्याचबळावर राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा दावा आमदार शेळके यांनी प्रचारसभेत केला. विकासकामांच्या माध्यमातून निर्माण झालेली ‘विकासपुरुष’ ही त्यांची ओळख आता पक्षाला विजयाच्या दिशेने नेणारी ठरत असल्याचे पक्षकार्यकर्त्यांचे मत आहे.
हेही वाचा : स्वामी भक्तांकडून श्री खंडोबा व म्हाळसा देवीचे चांदीचे मुखवटे अर्पण
मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची प्रचारफेरी नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र बबनराव सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पांगळोली, तुंगार्ली आणि इंदिरानगर परिसरात उत्साहात पार पडली. पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, वाहतूक व्यवस्थापन आणि परिसर विकास या महत्त्वाच्या मुद्द्यांवर उमेदवारांनी नागरिकांशी संवाद साधला.
प्रचार दौऱ्यात दिसून आलेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हा पक्षाच्या विजयाचा ‘टर्निंग पॉईंट’ ठरणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले. कार्यकर्त्यांची एकजूट पाहून आमदार शेळके यांनी आवाहन केले, “लोणावळ्याच्या सर्वांगीण विकासाची वेळ आली आहे. माझ्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजय द्या.”
लोणावळा बदलत आहे, आणि हा बदल अधिक वेगाने घडवायचा असेल तर राष्ट्रवादीला विजय मिळायलाच हवा. नागरिकांचा मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद पाहता आमचा नगराध्यक्ष उमेदवार दहा हजारांपेक्षा जास्त मतांनी विजयी होईल, असा मला ठाम विश्वास आहे. विकास हा आमचा अजेंडा आहे आणि तोच लोणावळ्याचा भविष्यकाल निश्चित करणार आहे.
– सुनील शेळके, आमदार, राष्ट्रवादी.




