‘देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत’; आमदार हेमंत रासने

पुणे | राज्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तर कसबा विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांना पराभवाला सामोरे जावे लागले. या निवडणुकीत भाजपचे नेते माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने हे प्रचंड मताधिक्याने निवडून आले. यानंतर हेमंत रासने चांगलेच अॅक्टिव्ह झाले आहेत. रासने यांनी आज पुणे महापालिकेतील अधिकारी वर्गांसोबत मतदार संघातील पाहणी दौरा केला.
यावेळी हेमंत रासने म्हणाले, विधानसभा निवडणुकी दरम्यान जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यानुसार कचरा मुक्त कसबा ही मोहीम हाती घेण्यात आली असून आज सकाळी सात वाजल्यापासून मतदार संघातील अनेक भागात अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. त्याबाबत आवश्यक त्या सूचना केल्या आहेत आणि ते आठ दिवसात अहवाल देतील, त्यानंतर आमची पुन्हा एकदा बैठक झाल्यावर कसबा मतदार संघ कचरा मुक्त करण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे जाणार आहोत. या उपक्रमात नागरिकांनी अधिकाधिक सहभागी व्हावेत. या उपक्रमासाठी काही सूचना कराव्यात.
हेही वाचा – एकनाथ शिंदे यांच्याकडून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा
देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहे. याबाबत विचारलं असता ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि महायुतीमधील प्रमुख नेतेमंडळी मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेतील, पण मी एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे माझे नेते देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, हीच इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.





