breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

मिशन- २०२२ : महापालिका निवडणुकीत पिंपरी विधानसभा मतदारसंघ ठरणार ‘किंगमेकर’ पण..!

आमदार आण्णा बनसोडे सक्रिय होण्याची गरज

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भूमिकेकडे लक्ष

पिंपरी । अधिक दिवे
पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुका तोंडावर आल्या आहेत. सर्वच पक्षांनी महापालिकेवर सत्ता आणण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सध्या सत्ताधारी भाजपा विरोधात रान पेटविण्यासाठी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील आणि टीमने ताकद पणाला लावली आहे. मात्र, महापालिकेत राष्ट्रवादीच्या घड्याळाची टिकटिक वाजवायची असेल, शहरातील पक्षाचा एकमेव आमदार असलेल्या आण्णा बनसोडे यांनी सक्रिय होण्याची गरज आहे. बनसोडे पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरल्यास महापालिका निवडणुकीत पिंपरी विधानसभा ‘किंगमेकर’ ठरणार आहे.
सत्ताधारी भाजपाला चिंचवड व भोसरी वगळता पिंपरी विधानसभा मतदारसंघात अपयश आल्याचे दिसते. त्याठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार आण्णा बनसोडे यांची मतदारसंघावर मोठी पकड आहे. त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचे जाळे आहे. या बरोबरच जुने आणि नवीन नेते, कार्यकर्ते यांचा संगम घडवुन आणण्यात बनसोडे यशस्वी ठरत आहेत. त्यामुळे सत्ताधारी भाजपाकडून पिंपरी विधानसभा ‘टार्गेट’ करून काम सुरू केले आहे.
परिणामी, पिंपरी मतदार संघात भाजपाविरुद्ध राष्ट्रवादी हा सामना रोमांचकारी ठरणार आहे. सध्यस्थितीला या मतदार संघामध्ये राष्ट्रवादी नगरसेवक सर्वाधिक सक्रीय आहेत. स्थायी समितीचे सदस्य राजू बनसोडे, सुलक्षणा शिलवंत-धर यांच्यासह स्थानिक नगरसेवकांनी भाजपाच्या विरोधात वातावरण निर्मिती केली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मावळचे आमदार सुनील शेळके आणि काँग्रेसचे संग्राम जगताप यांना ‘पीएमआरडीए’वर सदस्यपदी नियुक्त करण्यात आले. आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून महामंडळांच्याही नियुक्त्या होणार आहेत. राष्ट्रवादीने स्थानिक नेतृत्व संपवले असा प्रचार भाजपाकडून अनेकदा केला जातो. त्यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी आमदार बनसोडे यांना राज्य अथवा जिल्हा स्तरावर ताकद देण्याची गरज आहे. तसे झाल्यास बनसोडे शहरात सक्रीय होतील आणि भाजपाला आव्हान दिले जाईल, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.
तसेच, आमदार बनसोडे यांचा राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश झाला पाहिले, असाही बनसोडे समर्थकांची भावना आहे.
राष्ट्रवादीत शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांची एकाकी झुंज –
सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचार व इतर चुकीच्या कारभारावर सध्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील एकाकी झुंज देत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या कारभारावर निवेदने देणे, आंदोलने, मोर्चे काढण्यासाठी ते पुढाकार घेत आहेत. भाजपाच्या सत्ताकाळात गलीतगात्र झालेल्या राष्ट्रवादीची ‘ज्योत’ वाघेरे-पाटलांनी ‘तेवत’ ठेवली आहे. त्यांच्यासोबतीला आमदार आण्णा बनसोडे यांची ताकद मिळाल्यास पक्षाला निवडणुकीतील यशापासून रोखणे भाजपाला अवघड आहे.
सिद्धार्थ बनसोडे यांच्या प्रकरणापासून नाराजी…
आमदार आण्णा बनसोडे यांच्या पुत्राला ठेकेदार मारहाणीच्या प्रकरणात अटक करण्यात आली. या वेळी पक्षाकडून बनसोडे यांना सकारात्मक पाठिंबा दिला नसल्याची चर्चा आहे. तेव्हापासून आमदार बनसोडे पक्षाच्या कारभारावर नाराज असल्याचे दिसते. पक्षाचे शहरात होणारे आंदोलन, बैठकांना आमदार बनसोडे अनुपस्थित राहत आहेत. या वरून ते नाराज असल्याचे स्पष्ट होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यात देखील ते अनुपस्थित राहिल्याने पक्षाच्या नेत्यांनी आता चिंतन करण्याची गरज आहे.
२०१९ च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार?
विधानसभा निवडणुकीत २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पहिल्यांदा सुलक्षणा शिलवंत-धर यांना तिकीट दिले होते. मात्र, ऐनवेळी अण्णा बनसोडे यांनी बंडखोरीचा इशारा दिल्यामुळे बनसोडेंच्या तिकीटावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यावेळी स्थानिक गाववाल्यांसह अनेक प्रस्तापितांनी बनसोडे यांच्या नावाला पसंती दिली होती. निवडणूक निकालानंतर बनसोडे यांचे मतदार संघावरील वर्चस्व सिद्ध झाले. भाजपा- रिपाइं युतीच्या उमेदवार चंद्रकांता सोनकांबळे आणि शिवसेनेचे उमेदवार गौतम चाबुकस्वार यांचा पराभव करीत बनसोडे यांनी मतदार संघावर पकड निर्माण केली. त्यामुळे आता पुन्हा महापालिका निवडणुकीत पिंपरीसह चिंचवड आणि भोसरीमध्ये ‘राष्ट्रवादी पुन्हा’ चे चित्र निर्माण करण्यासाठी बनसोडे यांची साथ महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button