मंत्री नितेश राणे यांचा बंडखोरांना इशारा; अपक्षांना रसद पुरवणारी अदृश्य शक्ती कोण?

Nitesh Rane : शिवसेनेचा पारंपारिक बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला मोठे यश मिळाले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपाप्रणीत महायुतीने स्वबळावर बहुमताचा आकडा गाठला. मंत्री नितेश राणे यांच्या वैभववाडी आणि तळकोकणातील पंचायत समित्यांच्या जागांवरही भाजपाला मोठे यश मिळाले. दुसरीकडे- शिवसेना ठाकरे गटाला या निवडणुकीत मोठा धक्का बसला असून त्यांचे अपक्षांपेक्षाही कमी उमेदवार निवडून आले. या निकालानंतर मंत्री नितेश राणे यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. त्याशिवाय अपक्षांना साथ देणाऱ्या अदृश्य शक्तींना त्यांनी इशाराही दिला.
पत्रकार परिषदेत नितेश राणे म्हणाले की- सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीला चांगले यश मिळताना दिसून येत आहे. सध्या अनेक ठिकाणी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या जागांवर महायुतीचे उमेदवार पुढे आहेत. २०१७ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत आमचे ५० पैकी ४२ उमेदवार निवडून आले होते. यंदाही आम्हाला जवळपास ४६ ते ४७ जागांवर नक्कीच विजय मिळेन. ग्रामीण भागात मिळालेल्या सत्तेच्या आधारे आम्ही विकासकामांना गती देऊ. आम्ही साडेचार लाख दरडोई उत्पन्न करण्याचा संकल्प हाती घेतला आहे.
हेही वाचा – एकनाथ शिंदे अथक परिश्रम घेतायत! पंतप्रधान मोदींच्या एकनाथ शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
अपक्ष उमेदवारांबाबत बोलताना नितेश राणे म्हणाले की- निवडून आलेले पाचही अपक्ष उमेदवार भाजपातील बंडखोर आहेत. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नावाचा वापर करून ते निवडून आले आहेत. त्यांच्यामुळे भाजपाप्रणीत महायुतीला मोठा फटका बसला आहे. त्यांना अदृश्य मदत करणाऱ्या हातांना बाजूला केले जाईल. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्या हातांना बाजूला करण्याची वेळ आता आली आहे, असा इशाराही राणे यांनी दिला. त्यामुळे तळकोकणात अपक्षांना रसद पुरवणारी अदृश्य शक्ती कोण? अशी चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात रंगली.
रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांत शिंदे गट आणि भाजपाच्या युतीने एकतर्फी सत्ता काबीज केली. तालुक्यातील १० जिल्हा परिषद गट आणि २० पंचायत समिती गणांवर महायुतीने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत रत्नागिरीच्या राजकारणाला निर्णायक कलाटणी दिली. मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होताच निकालांनी विरोधकांची गणिते कोलमडली. शिंदे गटाच्या विजयाची घोषणा होताच मतमोजणी केंद्र परिसरात गुलालाची उधळण, ढोल-ताशांचा निनाद पाहायला मिळाला. हा जल्लोष केवळ आनंदाचा नव्हे, तर विरोधकांना दिलेला राजकीय इशाराच असल्याची चर्चा रंगली.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा




