मराठा आरक्षण : जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनाला फक्त एका दिवसाची परवानगी
जरांगे पाटील अंतरवली सराटीतून आंदोलकांसह मुंबईच्या दिशेने रवाना
मुंबई : मराठा समाजासाठी आरक्षणाच्या मागणीला नवी गती देण्यासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत. 29 ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर अनिश्चितकालीन आंदोलन आणि उपोषण सुरू करण्याची त्यांनी हाक दिली आहे. यासाठी ते आज सकाळी अंतरवली सराटीतून आंदोलकांसह मुंबईच्या दिशेने रवाना झाले.
दरम्यान, त्यांच्या आंदोलनाबाबत मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना मुंबई पोलिसांनी फक्त एका दिवसाची परवानगी दिली आहे. या परवानगीनुसार 29 ऑगस्ट रोजीच आंदोलन होऊ शकणार असून शनिवार आणि रविवारी (30 आणि 31 ऑगस्ट) कोणतीही परवानगी देण्यात येणार नाही.
अटी-शर्तींसह परवानगी
मुंबई पोलिसांनी आंदोलनासाठी काही अटी-शर्ती घातल्या आहेत :
-
आंदोलनासाठी केवळ 5 हजार आंदोलकांनाच सहभागी होण्याची परवानगी
-
आंदोलकांसोबत 5 वाहनांना प्रवेशाची परवानगी
-
आंदोलनासाठी 7 हजार चौरस मीटर जागा राखीव
-
मोर्चा दुसरीकडे नेण्यास बंदी
-
ध्वनीक्षेपक वा गोंगाट करणारी उपकरणं वापरण्यास मनाई
-
सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेतच आंदोलनास परवानगी
जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया
मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या मर्यादित परवानगीवर मनोज जरांगे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.
ते म्हणाले, “पोलिसांनी नियमांच्या अटींसह परवानगी दिली आहे, त्याचे स्वागत आहे. मात्र, केवळ एका दिवसाची परवानगी मान्य नाही. आम्ही आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही. सरकारने एका दिवसात आरक्षण द्यावे, मग आम्ही आंदोलन मागे घेऊ.”
आंदोलनाचा मुद्दा
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये ओबीसी प्रवर्गात 10% आरक्षण मिळावे यासाठी हे आंदोलन जाहीर केले आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.
हेही वाचा: अमेरिकेचे अतिरिक्त ‘टॅरिफ’ : भारताला फटका, चीन-पाकिस्तानला संधी




