माणिकराव कोकाटेंची कृषिमंत्रीपदावरून उचलबांगडी, दत्तात्रय भरणेंकडे कृषी खात्याची धुरा

मुंबई | विधानपरिषदेत रमी खेळताना चित्रफितीत कैद झाल्याने वादग्रस्त ठरलेले राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची अखेर कृषिमंत्रीपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकाटे यांच्याकडील कृषी खात्याचा कार्यभार काढून घेत तो त्यांचे विश्वासू सहकारी दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपवला आहे. तर, कोकाटे यांना भरणे यांच्याकडील क्रीडा आणि युवक कल्याण खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
विधानपरिषदेचे कामकाज सुरू असताना कोकाटे रमी खेळत असल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यावर कोकाटे यांनी हा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने दाखवला गेला असून, आपण रमी खेळत नसल्याचा खुलासा केला होता. मात्र, विधानसभेच्या सभापतींच्या अहवालात कोकाटे २२ ते २४ मिनिटे रमी खेळत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर कारवाई अटळ होती.
हेही वाचा : केंद्रीय मंत्रिमंडळाची चार बहुमार्गीकरण प्रकल्पांना मंजुरी
यापूर्वीही कोकाटे यांच्या काही वक्तव्यांमुळे ते वादात सापडले होते. तसेच, १९९५ मध्ये कागदपत्रांच्या फेरफार आणि फसवणुकीच्या आरोपाखाली त्यांना आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने फेब्रुवारी २०२५ मध्ये दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली होती. या पार्श्वभूमीवर त्यांचे खाते बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.




