breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेराजकारण

चौकशी पारदर्शक, विनाहस्तक्षेप करा; कल्याणीनगर प्रकरणात अजित पवार यांच्या सूचना

पुणे : “अनेक जण आमदारांना भेटत असतात. आमदार सह्या करुन पत्र पीएकडे ठेवतात. माझ्याकडेही शेकडो पत्र असतात. माझ्याकडूनही मी पत्र देतो. बदली करा. परंतू ती नियमांत आहे का? नाही हे पाहण्याचे काम संबंधित विभागाचे आहे. ते शिफारस पत्र असते. मी अगोदरच सांगितले आहे, की चौकशी पारदर्शकपणे करा, कोणाच्याही हस्तक्षेपाला बळी पडू नका, ही घटना जनतेची झाली आहे. माझ्यावरही पोलीस आयुक्तांना फोन केल्याचा आरोप होत आहे. मात्र, माझा एकही कॉल यासंदर्भात पोलीस आयुक्तांना गेलेला नाही. पालकमंत्री म्हणून पोलीस आयुक्तांना वरचेवर फोन करतो. या केसमध्ये मी फोन केला नाही,’ अशी माहिती पालकमंत्री अजित पवार यांनी येथे दिली.

पवार हे एका कार्यक्रमासाठी शनिवारी पुण्यात आले होते. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. पालकमंत्री म्हणाले, “या घटनेनंतर स्वत: गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात आले. माहिती घेऊन पोलीस खात्याला चौकशी बारकाईने करण्याची सूचना केली. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही या केसमधध्ये बारकाईने लक्ष घालून चौकशीचे आदेश दिले. मी पालकमंत्री म्हणून सूचना दिल्या. चौकशी पुढे जाऊ लागली, तसा अनेकांचा सहभाग यामध्ये पुढे येऊ लागला.

चौकशीत दोन पोलीस अधिकाऱ्यांनी दिरंगाई दाखवली, त्यांच्यावर कारवाई झाली. त्यानंतर ससून रुग्णालयातील दोषी आढळले. त्यांवरही कारवाई करण्यात आली. तेव्हा हसन मुश्रीफ परदेशात होते, त्यांनी परदेशातून आल्यावर वैद्यकीय शिक्षण खात्याच्या अंतर्गत ससून रुग्णालय येत असल्याने त्यांनीही चौकशी केली. उत्पादन शुल्क विभागाचा यात संबंध येतो. यामुळे शंभुराज देसाईंनीही पत्रकार परिषद घेऊन कारवाईची माहिती दिली. त्यांनी एक्साइज विभागाला दिलेल्या सूचना सांगितल्या.

हेही वाचा – जगात कोणत्या देशाकडे किती सोने, भारताच्या तिजोरीत किती आहे सोने

ही गंभीर बाब जशी सगळ्यांनी घेतली, तशी ती सरकारनेही गांभीर्याने घेतली. आम्ही सारखे कॅमेरासमोर येत नाही म्हणून लपवाछपवी करतो, असे काही नाही. विरोधकांनी काय मुद्दा काढायचा, तो त्यांच्या विषय. त्या बद्दल मी काही बोलणार नाही. पण, ही घटना घडल्यापासून आजपर्यंत चौकशांमध्ये जे जे दोषी आढळतात. त्यांवर कारवाई करण्यात येत आहे.’

आमदार सुनील टिंगरे यांना माध्यमांसमोर न येण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अपघातप्रकरणी शहरात देशभरातील माध्यम प्रतिनिधी दाखल झाले आहेत. यातील काहींनी येरवडा पोलीस ठाण्यात तसेच ससून रुग्णालयात स्टिंग ऑपरेशनही केले आहे. तर, बाल न्यायमंडळाच्या सदस्याचा पाठलागही केला आहे. माध्यमांसमोर चुकून काही वेगळे स्टेटमेंट गेल्यास प्रकरण अंगलट येईल, असा सल्ला टिंगरे यांना त्यांच्या हितचिंतकांनी दिला आहे. मात्र, त्यांची शांतता त्यांना आणखी आरोपीच्या पिंजऱ्यात नेऊन ठेवत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button