breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

नवाब मलिकांच्या अटकेविरोधात महाविकास आघाडीचं आंदोलन; पण चर्चा शिवसेनेच्या गैरहजेरीची

मुंबई |

केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करून राजकीय फायदा उठवित असल्याचा आरोप करत महाविकास आघाडीच्या वतीने शुक्रवारी ठाण्यात मोदी सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. परंतु महाविकास आघाडीचा घटक असलेल्या शिवसेनेचा एकही पदाधिकारी आणि कार्यकर्ता आंदोलनात सहभागी झालेला नव्हता. शिवसेनेच्या गैरहजेरीमुळे महाविकास आघाडीत सारे काही अलबेल नसल्याची चर्चा आहे.

ठाणे महापालिकेच्या निवडणुका येत्या काही महिन्यात होणार आहेत. या निवडणुकांच्या तोंडावर मिळेल त्या मुद्द्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चिखलफेक सुरु होती. हा वाद दिवसेंदिवस वाढू लागला होता. हा वाद आणखी चिघळू नये म्हणून राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी संयमाचा सूर आवळले होते. शिवसेनेकडून कितीही टीका झाली तरी त्याला या टीकेला आता प्रतिउत्तर देणार नाही अशी भूमिका जाहीर करत संपूर्ण जिल्ह्यात आगामी निवडणुकांमध्ये आघाडी करावी अशास्वरुपाचा ठराव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्षांच्या एका बैठकीत मंजुर करण्यात आल्याचे मंत्री आव्हाड़ यांनी सांगितले होते. तर, ठाणे जिल्ह्यातही आघाडी करण्यात कोणतीही अडचण नाही, अशी भूमिका मंत्री शिंदे यांनीही मांडली होती. त्यामुळे या दोन्ही पक्षातील तणाव काही प्रमाणात निवळल्याचे दिसून आले. असे असतानाच शुक्रवारी महाविकास आघाडीने पुकारलेल्या आंदोलनात शिवसेनेचा नेते आणि कार्यकर्ते उपस्थित नव्हते.

राष्ट्रवादीचे नेते व अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांना सर्मथन देण्यासाठी आणि केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने शुक्रवारी ठाण्यात आंदोलन करण्यात आले. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे, महापालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलनात केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात शिवसेनेचा एकही पदाधिकारी आणि कार्यकर्ता हजर नव्हता. यामुळे ठाण्याच्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे अद्याप मनोमिलन झालेले नसल्याचे दिसून येते. या संदर्भात शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख व महापौर नरेश म्हस्के यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button