महादेव जानकरांचा देवेंद्र फडणवीसांना टोला; म्हणाले, अजित पवारांना..
![Mahadev Jankar said that there was no need to break Ajit Pawar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/mahadev-jankar--780x470.jpg)
मुंबई : अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री तर त्यांच्यासोबतच्या इतर ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यानंतर आता भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे काही आमदार नाराज असल्याचं वारंवार बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
महादेव जानकर म्हणाले की, देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, एकनाथ शिंदे आणि अजित पवार भाजपबरोबर आल्याने फायदा होईल. पण भाजपा एवढा मोठा पक्ष होता, तर अजित पवार यांना फोडण्याची गरज नव्हती. भाजपावर टीका करण्याएवढा माझा मोठा झाला नाही. भाजपा हा जगातील मोठा पक्ष आहे. माझा पक्ष वाढवण्यासाठई मी प्रयत्न करत आहे.
हेही वाचा – ‘सांडपाणी निचरा’ व्यवस्था सक्षमीकरण
गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे मी भाजपाबरोबर गेलो होतो. गोपीनाथ मुंडे हे लोकनेते होते. पण, आताचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्यापेक्षा जास्त हुशार आहेत. त्यामुळे त्यांना राष्ट्रीय समाज पक्षाची गरज वाटत नाही. म्हणून आपण भाजपाच्या मागे लागण्यात अर्थ नाही, असं महादेव जानकर म्हणाले.
राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून लोकसभेच्या ५४३ जागा लढणार आहोत. काही राज्यांत आमचा विजय होईल. मी स्वत: महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधून लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहणार आहे. राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून मी दिल्लीला जाणार. पंकजा मुंडे या भाजपाच्या सचिव आहेत. त्यामुळे दिल्या घरी सुखी रहा एवढंच बहिणीला सांगेल. जास्त त्रास होऊ लागल्यावर बहिणीला साडी-चोळी देऊन आणण्यासाठी जाणार, असंही महादेव जानकर म्हणाले.