पराभूत उमदेवारांची सर्वोच्च न्यायालयात धाव!
केजरीवाल दिल्लीत झालेल्या संयुक्त बैठकीत निर्णय
![loser, candidate, supreme, court, run, Kejriwal, Delhi, joint, meeting, decision,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/12/sharad-pawar-6-780x470.jpg)
पुणे : जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांनी इव्हीएमविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पुढाकाराने यासंदर्भात दिल्लीत झालेल्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल तसेच काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार अभिषेक मनू सिंघवी त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
या बैठकीला प्रशांत जगताप (हडपसर), दत्ता बहिरट (शिवाजीनगर), रमेश बागवे (कॅन्टोन्मेट), अश्विनी कदम (पर्वती), संजय जगताप (पुरंदर), राहुल कलाटे (चिंचवड) उपस्थित होते. हर्षवर्धन पाटील (इंदापूर), संग्राम थोपटे (भोर), रमेश थोरात यांनी बैठकीत ठरेल त्या निर्णयाबरोबर असल्याचे कळवले आहे. त्याशिवाय काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (संगमनेर) हेही या बैठकीला उपस्थित होते.
मंगळवारी दुपारी या उमेदवारांची शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक झाली. त्यामध्ये पवार यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. इव्हीएमबाबत सर्वांनीच संशय व्यक्त केला. त्यासंबंधीची आकडेवारीही त्यांनी सादर केली. पवार यांनी त्यानंतर अभिषेक मनू सिंघवी यांच्याबरोबर संपर्क साधला. तसेच केजरीवाल यांच्याबरोबर दूरध्वनीवर चर्चा केली.
निकाल नव्हे, इव्हीएम विरोधात लढा..
सिंघवी हे सर्वोच्च न्यायालयातील नावाजलेले वकील आहेत. त्यांनी मंगळवारी सायंकाळी पवार यांच्या समवेत या उमेदवारांची भेट घेऊ, असे सांगितले. त्याप्रमाणे मंगळवारी रात्री उशिरा ही बैठक झाली. निकालाच्या विरोधात नाही तर इव्हीएममधील मतमोजणीच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे.
‘या’ मुद्यावर करणार याचिका…
निवडणूक आयोगाला कळवूनही ते मतमोजणीबाबत आवश्यक ती माहिती देण्यास तयार नाहीत, त्यासाठीचे पैसे जमा केल्यानंतरही त्यांच्याकडून सहकार्य मिळत नाही, विशिष्ट संख्येतील यंत्रांमधीलच व्हीव्हीपॅटची मोजणी करण्यात येईल, असे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. लोकशाही व्यवस्थेत निकालाबाबत पारदर्शकता असणे गरजेचे आहे, या मुद्द्यावरून याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे समजते.