ताज्या घडामोडीमुंबईराजकारण

विधान परिषदेत भाजपचे गटनेते प्रवीण दरेकरांनी मांडलेल्या मुद्द्यावर गदारोळ

अंबादास दानवे यांचा तोल सुटला, भाजप नेते प्रसाद लाड यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ

मुंबई : विधान परिषद हे राज्याचं सर्वोच्च सभागृह मानलं जातं. पण या सभागृहात आज एक अनपेक्षित प्रकार बघायला मिळाला. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज संसदेत केलेल्या भाषणाचा मुद्दा सत्ताधारी आमदारांनी विधान परिषदेत मांडला. या मुद्द्यावरुन सभागृहात जोरदार खडाजंगी रंगली. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेचे अंबादास दानवे यांचा तोल सुटला आणि त्यांनी भाजप नेते प्रसाद लाड यांना अतिशय अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी मांडलेल्या मुद्द्यावर हा गदारोळ झाला. यावेळी अंबादास दानवे आपली भूमिका मांडत असताना सत्ताधारी आमदारांनी आरडाओरड केली. यानंतर अंबादास दानवे यांचा तोल सुटला आणि त्यांनी प्रसाद लाड यांच्यावर भर सभागृहात शिवीगाळ केली. यावेळी भर सभागृहात दोन्ही नेत्यांनी एकमेकांना शिवीगाळ केली.

नेमकं काय घडलं?
“सभापती महोदय, माझा मुद्दा हा आहे, हे वक्तव्य ज्याचं असेल त्याचं, ते लोकसभेत झालेलं आहे. त्याचा संबंध आपल्या कामकाजाशी येतो का?”, असा सवाल अंबादास दानवे यांनी केला. दानवे यांच्या या वक्तव्यावर सत्ताधारी आमदारांनी निशाणा साधला. त्यावर अंबादास दानवे आपली भूमिका मांडू लागले. “मला असं वाटतं हिंदुत्वाचा मुद्दा मांडणारे हे आपल्या सभागृहात..”, असं अंबादास दानवे म्हणत होते. याच दरम्यान सत्ताधारी आमदारांकडून आरडाओरड सुरु झाली. यावेळी अंबादास दानवे यांचा संयम सुटला. “ऐ माझ्याकडे हात करायचा नाही”, असं म्हणत अंबादास दानवे यांनी आर्वाच्य भाषेत शिवीगाळ करायला सुरुवात केली. यावेळी दोन्ही बाजूंनी शिवीगाळ झाल्याची माहिती समोर येत आहे.

प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
विधान परिषदेतील गदारोळानंतर प्रसाद लाड यांनी विधान भवन परिसरात माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत अभद्र भाषा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शब्दांत त्याचा विरोध केला. अशाप्रकारे हिंदूंचा अपमान सभागृहात आणि देशात सहन केला जाणार नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. आमचे गटनेता प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय आणि सर्व सदस्यांनी सभागृहात हा विषय ठेवला. विषय ठेवल्यानंतर महाविकास आघाडीच्या सर्व सदस्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सभागृहाचं कामकाज पाच मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं. पण पुन्हा जेव्हा सभागृहाचं कामकाज सुरु झालं तेव्हा प्रवीण दरेकर यांनी आपला मुद्दा मांडत या विषयी भूमिका मांडली”, असं प्रसाद लाड यांनी सांगितलं.

“मी याच मुद्द्यावर राहुल गांधी यांच्या निषेधाचा ठराव करुन लोकसभेत पाठवला जावा, अशी मागणी केली. किंवा विरोधी पक्षनेत्याने यावर उत्तर द्यावं, अशी देखील मागणी केली. विरोधी पक्षनेता अंबादास दानवे उभे राहिले तेव्हा माझं भाषण सुरु होतं. त्यांनी सभागृहात सर्वांसमोर माझ्यावर शिवीगाळ केली. त्यांनी सभागृहाच्या सभापती निलम गोऱ्हे यांच्यासमोर माझ्यावर माईकवरुन आई-बहिणीवर शिवीगाळ केली. अंबादास दानवे यांनी हिंदुंचा अपमान केला आहे. मी या गोष्टीचा निषेध करतो”, अशी भूमिका प्रसाद लाड यांनी मांडली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button