‘महाकुंभ फालतू आहे, त्याला काहीही अर्थ नाही’; लालू प्रसाद यादव यांचं वादग्रस्त विधान

Lalu Prasad Yadav | नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री चेंगराचेंगरी झाली होती. यामध्ये आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर देशभरातून हळहळ व्यक्त होत आहे. याचबरोबर या दुर्दैवी घटनेबाबत संतापही व्यक्त होत आहे. अशातच राष्ट्रीय जनता दल (RJD) चे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांनी कुंभ स्नानाबद्दल वादग्रस्त विधान केले आहे.
लालू प्रसाद यादव म्हणाले, की ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. रेल्वेच्या या गैरव्यवस्थापनामुळे इतक्या लोकांचे जीव गेले. रेल्वेमंत्र्यांनी याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असं ते म्हणाले. यावेळी लालू प्रसाद यांना महाकुंभमेळ्यासाठी गर्दीच्या व्यवस्थापनाबाबत विचारले असता ते म्हणाले, कुंभला काही अर्थ नाही, कुंभ फालतू आहे, असं लालू प्रसाद यादव यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : ‘न्यू इंडिया बँकेतील घोटाळ्यात सर्व भाजपचे लोक’; संजय राऊतांचा गंभीर आरोप
रेल्वे बोर्डाचे कार्यकारी संचालक (माहिती आणि प्रसिद्धी) दिलीप कुमार यांनी रविवारी सांगितले की, नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीची चौकशी करण्यासाठी आणि घटनेमागील कारणे शोधण्यासाठी दोन सदस्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. त्याच वेळी, नवी दिल्ली रेल्वे स्टेशन घटनेतील पीडित आणि मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे. यामध्ये मृतांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची भरपाई, गंभीर जखमींना २.५ लाख रुपये आणि किरकोळ जखमींना १ लाख रुपयांची भरपाई देण्यात येणार आहे.